*कोंकण एक्सप्रेस*
*फुले दाम्पत्याचे विचार परिवर्तनशील*
*गोपुरी आश्रमात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी**
*कणकवली ः संजना हळदिवे*
महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार परिवर्तनशील आहेत. फुले दाम्पत्याचा समता, सहजीवन आणि सामाजिक परिवर्तनाचा विचार प्रत्येकाने समजून घेऊन तो कृतीत उतरवण्याचा संकल्प करूया, असे आवाहन मान्यवरांनी केले.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त गोपुरी आश्रमात सावित्रीचा जागर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गोपुरी आश्रमाच्या संचालिका अर्पिता मुंबरकर, आश्रमाचे व्यवस्थापक सदाशिव राणे, उमेश जाधव, राजेंद्र कदम, अर्चना तेंडुलकर, मीना मोरे, कल्पेश मुळये, हर्षता मोरे, काशीबाई परब, त्रिशा कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते
अंधश्रद्धा, अन्याय व भेदभावाविरुद्ध संवेदनशीलतेने पण सजगपणे आवाज उठविणे म्हणजेच सावित्रीबाई व ज्योतिबांच्या सामाजिक संघर्षाची आठवण कृतीतून जपणे नितांत गरजेचे आहे. स्त्री-पुरुषांनी आपले कार्य केवळ कुटुंबापुरते न ठेवता समाजाभिमुख करावे. कुटुंबहितासोबत समाजहित जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. माणूस घडविण्याची शिकवण ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याकडून मिळते. फुले दाम्पत्याच्या शिकवणीच्या वाटेवरून चालण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, असे मत अर्पिता मुंबरकर यांनी व्यक्त केले. राजेंद्र कदम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती दिली. आरंभी सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

