*कोंकण एक्सप्रेस*
*सिंधुदुर्गात राणे समर्थकांकडून उद्या शक्तीप्रदर्शन*
*जय नारायण … या टॅगलाइन खाली खा. नारायण राणेंच्या समर्थनार्थ राणे समर्थक एकवटले; बांदा ते कणकवली पर्यंत भव्य रॅली होणार*
*कणकवली ः संजना हळदिवे*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगरपरिषद निवडणूकांमध्ये राणे कुटुंबात विसंवाद निर्माण झाल्याचे चित्र राज्यात दिसू लागले. त्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राणे समर्थक कार्यकर्ते एकवटले आहेत. खा. नारायण राणे यांच्या समर्थनार्थ जय नारायण… या टॅग लाईनखाली रविवारी भव्य रॅली बांदा ते कणकवली काढण्यात येणार आहे. राणे समर्थक कार्यकर्त्यांकडून उस्फूर्तपणे कणकवली, कुडाळ मध्ये बैठका घेत हे नियोजन केल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर राणे समर्थक कार्यकर्त्यामध्ये व्हाट्सअप स्टेटस वर जय नारायण, आमची ओळख राणे कुटुंबीय.. अशा आशयाचे पोस्टर दिसत आहेत. या रॅलीत खा. नारायण राणे, आ. निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे यांचे राणे समर्थक कार्यकर्त्यांकडून जल्लोषी स्वागत होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यानंतर कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोर पटांगणावर मेळावा होणार असल्याची चर्चा आहे.
नगरपंचायत, नगरपरिषद निवडणूकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती तुटल्यामुळे पालकमंत्री नितेश राणे व शिवसेनेचे आ. निलेश राणे यांच्यात पक्षाची भूमिका निभावत असताना कटुता निर्माण झाल्याचे चित्र होते. मात्र, या काळात राणे समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली होती. खा. नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील निवडणूका यापूर्वी लढवल्या गेल्या. मात्र, या निवडणूकीत महायुती करण्याचा सुचना खा. राणे यांनी दिलेल्या असताना देखील युती झाली नाही. परिणामी राणे बंधुमध्ये राजकीय वैर होत असल्याचे चित्र उभे राहिले.
राणे समर्थकांमधील फुट नव्हे तर एकजूटच आहे, हे दाखवत रविवारी जिल्ह्यात खा. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आ. निलेश राणे हे एकत्रित जिल्ह्यात दाखल होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राणे समर्थकांकडून कार्यकर्त्यांकडून जल्लोषी स्वागत करत भव्य रॅली बांदा ते कणकवली काढण्यात येणार आहे. हजारो गाड्यांचा ताफा या रॅलीत असणार असून राणे समर्थक आपली शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. त्यानंतर कणकवलीत सायंकाळी 5 वाजता राणे समर्थक कार्यकर्त्यांचा मेळावा कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोर होणार असल्याचे वृत्त आहे. मात्र, याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे उद्याच्या स्वागताकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

