*कोंकण एक्सप्रेस*
*जिल्ह्रातील पारंपरिक दशावतार मंडळाचा सन्मान*
*वेंगुर्ला प्रतिनिधी*
एकांकिका स्पर्धेचे औचित्य साधून कलावलय वेंगुर्ला या संस्थेतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्रातील नऊ पारंपरिक दशावतारी मंडळांचा सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम 2 जानेवारी रोजी कालेलकर सभागृहात संपन्न झाला.
वेंगुर्ला येथे कलावलय आयोजित एकांकिका स्पर्धेला 2 जानेवारीपासून प्रारंभ झाला आहे. यानिमित्त कला क्षेत्रात योगदान देणा-यांचा अलिकडे सन्मान केला जात आहे. दरम्यान, दशावतार ही कोकणची संस्कृती आहे. सुमारे आठशे वर्षांपासून या कलेच्या माध्यमातून पुराणाचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम केले जात आहे. यासाठी अलिकडे बरीच दशावतार नाट्य मंडळे निर्माण झाली आहेत. परंतु, दहा ते बारा पिढ्या या कलेचा वारसा जपणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्रातील नऊ पारंपरिक दशावतार मंडळांच्या मालकांचा तसेच संचालकांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि वृक्षाचे रोप देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये आरोलकर दशावतार, चेंदवणकर-गोरे दशावतार, आजगांवकर दशावतार, बाळकृष्ण गोरे दशावतार, नाईक मोचेमाडकर दशावतार, वालावलकर दशावतार, मामा मोचेमाडकर दशावतार, खानोलकर दशावतार आणि पार्सेकर या दशावतार नाट्य मंडळांचा समावेश आहे.
हा सन्मान लेखक, दिग्दर्शक तथा ज्येष्ठ रंगकर्मी विजयकुमार फातर्पेकर, नगराध्यक्ष दिलीप गिरप, कलावलयचे अध्यक्ष बाळू खांबकर, सचिव संजय पुनाळेकर, समिता गुणे, परिक्षक प्रमोद लिमये, श्रीनिवास नार्वेकर, बी.के.सी.असोसिएशनचे अध्यक्ष सतिश डुबळे यांच्या हस्ते करण्यात आला. तुषार नाईक यांंनी दशावतार ही कला कशाप्रकारे हालअपेष्टा काढत जीवंत ठेवली जाते याबाबत सविस्तर माहिती देऊन दशावतार मंडळांची दखल घेऊन सन्मान केल्याबद्दल कलावलय संस्थेचे आभार मानले. तर सौरभ पाटकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशांक मराठे यांनी केले.

