*कोंकण एक्सप्रेस*
*सराईत गुन्हेगार राजन गमरे ला गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने ठोकल्या बेड्या*
*सापळा रचून कणकवलीत कारवाई; पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांनी केले मिशन फत्ते*
*कणकवली ः संजना हळदिवे*
. फोंडाघाट येथे घरात घुसून दोन महिलांच्या अंगावरील दागिने चोरण्याचा प्रयत्न फसल्यानंतर पसार झालेल्या टोळीतील राजन शंकर गमरे (५७, रा. सांताक्रूझ पूर्व मुंबई) याला स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने कणकवली रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून बेड्या ठोकल्या आहेत. संशयित राजन गमरे हा राज्यभरात विविध चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सराईत गुन्हेगार आहे. ही कारवाई सोमवारी रेल्वे स्टेशन परिसरात गुन्हा अन्वेशन शाखेच्या पथकाने केली आहे.
या घटनेमध्ये एकूण सहा संशयीत आरोपी होते. कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत 6 संशयितांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या पथकामध्ये गुन्हा अन्वेषण शाखेचे हवालदार राजू जामसंडेकर, आशिष गंगावणे, किरण देसाई आदींचा सहभाग आहे. या कारवाई बद्दल सर्वच स्तरातून पोलीसांचे कौतुक होत आहे.
फोंडाघाट येथे चोरीच्या प्रयत्नाची घटना 30 नोव्हेंबरला सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली होती. फिर्यादी तृप्ती लिंग्रस व त्यांची आई या दोघी घरी होत्या तर तृप्ती यांचे भाऊ मॉर्निंग वॉकला गेले होते. याच दरम्यान संशयित चोरट्यांनी जबरदस्तीने त्यांच्या घरात घुसुन चोरीचा प्रयत्न केला. त्यांनी तृप्ती व तिच्या आईच्या अंगावरील दागिने पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघींनीही आरडाओरड केल्यानंतर तिन्ही चोरटे आपल्या हातातील साहित्य तिथेच पसार झाले होते. याबाबत तृप्ती यांच्या फिर्यादीनुसार कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यानुसार सर्वही आरोपींना ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे.

