*कोकण Express*
*ज्येष्ठ दशावतारी कलाकार, काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते बी. के.तांबे यांचे निधन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
ज्येष्ठ दशावतारी कलाकार, काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते बी. के. उर्फ भिकाजी कमलाकर तांबे (68) यांचे आज पहाटे तीनच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने कणकवली तालुक्यातील एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व हरपले असून, बी के यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
बी. के. तांबे यांनी भालचंद्र दशावतार नाट्य मंडळ च्या माध्यमातून आपली दशावतारी कला जोपासली होती. ज्येष्ठ दशावतारी कलावंत म्हणून देखील जिल्ह्यात ओळख होती. तसेच हळवल गावचे सात वर्षे सरपंच व त्या नंतर उपसरपंच म्हणूनही त्यांनी काम केले होते. जिल्ह्यात अनेकांशी त्यांचे स्नेहाचे संबंध होते.
शासनाच्या वृद्ध कलाकार मानधन समितीवर सदस्य म्हणूनही ते कार्यरत होते. सामाजिक सांस्कृतिक सह विविध क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेत राज्य शासनाकडून त्यांना मानाचा समजला जाणारा दलित मित्र हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता. दशावतारी कलेची आवड असल्यामुळे त्यांनी स्वतःची भालचंद्र दशावतार नाट्य मंडळ स्थापन करून त्या माध्यमातून ही कला जोपासली होती. त्या नाट्यमंडळाला या वर्षी पन्नास वर्षे पूर्ण झाली. संस्कृती क्षेत्रासह राजकीय क्षेत्रातही त्यांच्या सक्रिय सहभाग होता. काँग्रेसचे तत्कालीन तालुकाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम करत काँग्रेस पक्ष तालुक्यात घराघरात पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले होते. सामाजिक क्षेत्रात काम करत असताना त्यांनी अनेक स्तरावर आपला ठसा उमटविला होता. सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय कार्यकारिणीवर सदस्य म्हणून ते कार्यरत होते. तर हळवल रवळनाथ देवस्थानच्या कमिटीवर ते सदस्य म्हणून होते. त्यांच्या विविध स्तरातील कामाची दखल घेत आतापर्यंत यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, दोन विवाहित मुली, भाऊ, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर आज हळवल येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.