*कोंकण एक्सप्रेस*
*गढीताम्हाणे–सडेवाडीला एसटी बस सेवा सुरू*
*ग्रामस्थांत समाधानाचे वातावरण*
*पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून एसटी बस सेवा कार्यान्वित*
*शिरगाव : संतोष साळसकर*
पालकमंत्री श्री. नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून गढीताम्हाणे–सडेवाडी येथे अखेर एसटी बस सेवा सुरू करण्यात आली असून मंगळवार, दि. १६ डिसेंबर २०२५ रोजी ही सेवा प्रवाशांच्या सेवेसाठी मोठ्या उत्साहात कार्यान्वित झाली.
गढीताम्हाणे–सडेवाडी उत्कर्ष मंडळाच्या वतीने सन २०१४ पासून सडेवाडीपर्यंत एसटी बस सेवा सुरू व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. मंडळाचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत कदम, सेक्रेटरी श्री. सुधीर कदम, सल्लागार श्री. रघुनाथ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही बस सेवा सुरू होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत होते. तसेच भाजपचे कार्यकर्ते श्री. अमित कदम यांनी पालकमंत्री यांच्याकडे नियमित पाठपुरावा केला. यासोबतच गढीताम्हाणे ग्रामपंचायतीमार्फत संबंधित विभागाशी आवश्यक पत्रव्यवहार करण्यात आला होता.
या बससेवेच्या प्रारंभी बसला पुष्पहार घालून चालक व वाहक यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. श्रीफळ वाढवून बससेवेचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. ही बस सेवा दिवसातून तीन वेळा धावणार आहे. सडेवाडी येथे सुमारे ७० ते ८० लोकवस्ती असून आतापर्यंत ग्रामस्थांना सुमारे तीन किलोमीटर पायपीट करून बससाठी यावे लागत होते. तसेच बस चुकल्यास तळेबाजार येथून रिक्षासाठी सुमारे २५० रुपये मोजावे लागत असल्याने या बससेवेने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कार्यक्रमास सरपंच सौ. सुहासिनी इर्लेकर, श्री. अमित कदम यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी पालकमंत्री श्री. नितेश राणे यांचे विशेष आभार मानले. तसेच सडेवाडी उत्कर्ष मंडळाच्या वतीने सर्व सहकाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

