*कोंकण एक्सप्रेस*
*रहस्य, थरार आणि परंपरेचा संगम : ‘नाग भस्म तिलक’पिकुळे–लाडाचेटेंब येथील धालोत्सव रंगमंचावर*
*दोडामार्ग/ शुभम गवस*
तालुक्यातील पिकुळे–लाडाचेटेंब येथील धालोत्सव रंगमंच येथे रविवार, दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी सांस्कृतिक रसिकांसाठी एक खास पर्वणी ठरणार आहे. सिद्धीविनायक दशावतार नाट्य मंडळ, पिकुळे यांच्या वतीने या वर्षीचे नवे आणि बहुचर्चित रहस्यमय दशावतार नाटक “नाग भस्म तिलक” या नाटकाचा शुभारंभ प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. हा प्रयोग रात्री ठीक ९.०० वाजता रंगमंचावर सादर केला जाणार आहे.
सदर नाटक प्रसिद्ध सुंदर निरवडेकर यांच्या कथा-संकल्पनेतून साकारले असून, रहस्य, थरार, नाट्य आणि पारंपरिक दशावतार कलेचा सुरेख संगम या नाटकात पाहायला मिळणार आहे. प्रभावी संवाद, अंगावर काटा आणणारी कथानकाची मांडणी, नेत्रदीपक वेशभूषा आणि पारंपरिक संगीत यामुळे “नाग भस्म तिलक” हे नाटक प्रेक्षकांना खिळवून ठेवेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
दशावतार नाट्यकलेची परंपरा जपताना आधुनिक रंगभूमीचा प्रभावी वापर करणाऱ्या या प्रयोगाबाबत परिसरात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे या उद्घाटन प्रयोगास दोडामार्ग तालुक्यासह आजूबाजूच्या परिसरातील दशावतार रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मालक शत्रू गवस, अमित गवस व रत्नदीप गवस यांनी केले आहे.
सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या या रहस्यमय व धडाकेबाज नाट्यप्रयोगाला रसिकांचा भरभरून प्रतिसाद लाभेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

