*कोंकण एक्सप्रेस*
*दर्पण रत्न पुरस्कार 2026 चा मानाचा गौरव — प्रमोद गवस यांची सलग दुसऱ्या वर्षी चमकदार कामगिरी*
*सिंधुदुर्ग :शुभम गवस*
गोवा सिंधुदुर्ग न्युज या वृत्तवाहिनीचे संपादक तसेच डिजिटल मीडियातील प्रखर, रोखठोक आणि अभ्यासपूर्ण लेखणीसाठी विशेष ओळख असलेले पत्रकार प्रमोद गवस यांची यंदा प्रतिष्ठित ‘दर्पण रत्न पुरस्कार 2026’ साठी “आदर्श संपादक” या क्षेत्रात निवड झाली आहे. अभ्यासू लेखन, निर्भीड भूमिका आणि वस्तुनिष्ठ शैली या त्यांच्या खास वैशिष्ट्यांमुळे महाराष्ट्रासह गोवा राज्यातही त्यांना विशेष मान मिळत आहे.
डिजिटल पत्रकारितेवरील त्यांची पकड, त्वरित बातमी देण्याची क्षमता आणि कोणत्याही दबावाला न जुमानता केलेली तटस्थ मांडणी—या सर्व गुणांमुळे प्रमोद गवस यांनी स्वतंत्र अशी भक्कम ओळख निर्माण केली आहे. सिंधुदुर्ग व गोवा या दोन्ही ठिकाणी अनेक प्रतिष्ठित संस्थांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला असून त्यांना सातत्याने मानाचा सन्मान मिळत आला आहे.
गेल्या वर्षी पुणे न्यूज एक्सप्रेस या राज्यातील अग्रगण्य न्यूज चॅनलकडून त्यांना राज्यस्तरीय ‘आदर्श पत्रकार पुरस्कार’ प्रदान करण्यात आला होता. त्यानंतर यंदाही सलग दुसऱ्या वर्षी दर्पण रत्न पुरस्कार त्यांच्या नावे घोषित होताच सर्व स्तरांवरून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे.
पत्रकारितेत नवी मानके निर्माण करणाऱ्या त्यांच्या कार्याची सर्वत्र दखल घेतली जात असून त्यांच्या नावावर पुन्हा एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

