*कोंकण एक्सप्रेस*
*दोडामार्गात ओंकार हत्तीचे पुनरागमन; ग्रामस्थ भयभीत*
*दोडामार्ग/ शुभम गवस*
दोडामार्ग तालुक्यातील डोंगरपाल मार्गे कळणे परिसरात आज सायंकाळी ओंकार हत्ती पुन्हा दाखल झाला. मागील तीन महिन्यांपासून गोवा व सावंतवाडी भागात थैमान घालणाऱ्या या हत्तीच्या पुनरागमनामुळे ग्रामस्थ व शेतकरी पुन्हा भयभीत झाले आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी तालुक्यात गणेश टस्कर आणि मादी पिल्लू दाखल झाले असून त्यांनी केळी, सुपारी व नारळ बागांची तोडफोड सुरू केली आहे. त्यात आता ओंकार हत्ती दाखल झाल्याने वन विभागावर दुहेरी दबाव वाढला आहे.
पूर्वी या हत्तीने बांदा परिसरात म्हशीचा बळी घेतला होता तसेच मोर्ले येथील एका शेतकऱ्याचा मृत्यूही झाला होता. त्यामुळे हा हत्ती पकडून हटवावा, अशी मागणी सातत्याने होत आहे.
बुधवारी हत्ती कळणे भागात दिसल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी त्याला दूर लोटण्याचा प्रयत्न केला मात्र हत्ती त्यांच्या दिशेनेच पुढे आला. त्यामुळे ग्रामस्थांना माघारी फिरावे लागले.
दरम्यान, ओंकार व गणेश हे दोन्ही हत्ती एकत्र आल्यास संघर्षाची शक्यता असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

