*कोंकण एक्सप्रेस*
*‘टेक रेक्स २०२५’: तांत्रिक सर्जनशीलतेचा अविस्मरणीय अनुभव!*
*पणदूर महाविद्यालयात आयोजित महोत्सवात विविध महाविद्यालयांचा सहभाग : अनेक स्पर्धांत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग*
*पणदूर : प्रमुख अतिथी प्रणय तेली यांचे स्वागत करताना डाॅ.अरूण गोडकर. सोबत प्राचार्य राजेंद्र पवार व अन्य*
*सिधुदुर्गनगरी*
पणदूर येथील पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालयाच्या आयटी व सीएस विभागाच्या वतीने तंत्रज्ञानप्रेमी विद्यार्थ्यांना आपल्या कौशल्यांचे प्रदर्शन करण्यासाठी आणि नव्या ज्ञानाची ओळख करून देण्यासाठी ‘टेक रेक्स २०२५’ या तांत्रिक महोत्सवाचे २६ ते २८ नोव्हेंबरदरम्यान उत्साहात आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांचा सहभाग, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि सुयोजनामुळे हा महोत्सव अत्यंत यशस्वी ठरला. महाविद्यालय परिसरात ज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यांचा उत्साह दुणावला.
महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात झालेल्या उद्घाटन सोहळ्यास दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे सचिव डॉ. अरुण गोडकर यांनी अध्यक्षस्थान भूषविले. कुडाळ येथील नोबल कॉम्प्युटर्सचे संस्थापक प्रणय तेली प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच सी-कॉम डिजिटल मार्केटिंग आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनीचे चंदन बागवे, तसेच महाविद्यालयाचे देणगीदार व प्रसिद्ध उद्योजक अभिजित परब यांचीही उपस्थिती होती.
सुरूवातीला मुंबई २६/११ हल्ल्यात शहीद झालेल्यांना या निमित्ताने आदरांजली वाहण्यात आली. तसेच संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
उद्घाटनावेळी प्रमुख अतिथी प्रणय तेली यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, “एआय तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करा. दिवसातून किमान आठ तास आवडत्या विषयासाठी द्या आणि आयुष्यभर विद्यार्थी राहा,” असा प्रेरणादायी संदेश दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अरुण गोडकर यांनी या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रगतीची नवी दारे खुली होतील, अशी भावना व्यक्त केली. प्राचार्य प्रा. राजेंद्र पवार यांनी ‘टेक रेक्स’ विद्यार्थ्यांसाठी कौशल्यविकासाचा महत्त्वाचा मंच ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
तीन दिवस चाललेल्या या महोत्सवात विविध तांत्रिक व सर्जनशील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यात ट्रेजर हंट, बीजीएमआय–बॅटल रॉयल, कोड-डीकोड, क्विझ क्वेस्ट, रील मेकिंग, फोन फोटोग्राफी या स्पर्धांचा समावेश होता. जिल्ह्यातील विविध कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
निकाल पुढील प्रमाणे – बीजीएमआय (BGMI) स्पर्धा
प्रथम – श्रेयस पोटभरे व टीम (टीम ऑप्टिमस), दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय, पणदूर तिठा,
द्वितीय सिद्धेश चव्हाण व टीम (टीम एम्पायर गेमिंग), कणकवली कॉलेज, रील मेकिंग स्पर्धा प्रथम – अमेय कालेकर, दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पणदूर, द्वितीय – अथर्व कालेकर व श्रेयस पोटभरे (दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पणदूर), फोटोग्राफी स्पर्धा
प्रथम – तन्मय गोसावी (दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय), द्वितीय – अमेय कालेकर (दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय), क्विझ स्पर्धा -,प्रथम क्रमांक – मितेश चव्हाण (पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय), कोड-डीकोड स्पर्धा – प्रथम – संजना नलावडे (पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय), ट्रेजर हंट स्पर्धा – प्रथम – एस. वाय. बी.बी.आय. (पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय) यांनी प्राप्त केला.
समारोप सोहळ्यात विजेत्यांना सचिव डॉ. अरुण गोडकर व प्राचार्य प्रा. राजेंद्र पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रम समन्वयक प्रा. नागेश पालव यांच्या नेतृत्वाखाली आयटी-सीएस विभागातील सर्व प्राध्यापकांनी उत्कृष्ट नियोजन केले. प्रास्ताविक आयटी विभाग प्रमुख प्रा. उमा सावंत यांनी केले. सूत्रसंचालन पूर्वा मेस्त्री यांनी तर आभार प्रदर्शन मयुरी चिंदरकर यांनी केले. दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे पदाधिकारी, प्राचार्य आणि प्राध्यापकवर्ग यांनी विजेते व आयोजकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

