*कोंकण एक्सप्रेस*
*”इलाका किसका भी हो, धमाका निलेश राणे ही करेगा.” – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे*
*आमदार राणे यांची भरीव निधीची मागणी*
*मालवण : प्रतिनिधी*
“इलाका किसका भी हो, धमाका निलेश राणे ही करेगा.” असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निलेश राणे यांना शिवसेनेचे ‘खणखणीत नाणे’ असे संबोधत मालवणच्या जाहीर प्रचार सभेत शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ममता वराडकर आणि नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करून मालवणात विकासाचा नवा टप्पा सुरू करतानाच नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवा असे आवाहन केले
मालवण नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर प्रचार सभा मालवण येथील टोपीवाला हायस्कुलच्या मैदानावर सायंकाळी संपन्न झाली. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, काका कुडाळकर, संजय पडते, जिल्हा सचिव दादा साईल, जिल्हा समन्व्यक महेश कांदळगावकर, तालुकाप्रमुख विनायक बाईत, उमेश नेरुरकर, राजन सरमळकर, परशुराम पाटकर, राजा गांवकर, बबन शिंदे, विजय चव्हाण, बाळू तारी, जॉन नरोना, शेखर गाड, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ममता वराडकर, दिपलक्ष्मी पडते, सौ.प्राजक्ता शिरवलकर, मालवण महिला तालुकाप्रमुख मधुरा तुळसकर यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते.यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शिवप्रतिमा भेट देऊन स्वागत करण्यात आले.
या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण करत मालवण शिवसेनेचा अभेद्य किल्ला असल्याचा पुनरुच्चार केला.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आमदार निलेश राणे म्हणजे शिवसेनेची भगवी रेष आहेत. शिवसेनेचे खणखणीत नाणे आहेत. नारायण राणे यांचे बाळकडू त्यांना मिळाले आहे. त्यामुळे निलेश राणे हे घाबरणारे नाहीत. चांगल काम करताना कधी घाबरायचं नाही. मी पण कधी घाबरलो नाही, डॉक्टर नसताना सुद्धा मी अनेक ऑपरेशन केली आहेत, आम. निलेश राणे यांची या मतदार संघांसाठी काम करण्याची तळमळ आहे, प्रामाणिकपणा आहे, त्यांनी केलेले काम आपल्या समोर आहे. निलेश मी तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे, घाबरू नकोस, तू कोकणचा खऱ्या शिवसेनेचा हिरा आहेस असंच चांगलं काम करत राहा. पराभव दिसायला लागला की अनेकांचे दशावतार सुरु होतात, असे ना. शिंदे यांनी सांगत आम. राणे यांच्या कार्याचे कौतुक करतानाच विरोधकांनाही चिमटे काढले.
यावेळी मालवणला विकासाच्या नव्या उंचीवर आपल्याला घेऊन जायचं आहे. त्यासाठी आपण प्रस्ताव द्या, मालवणच्या विकासासाठी भरघोस निधी दिला जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. नगराध्यक्ष उमेदवारांसह सर्व उमेदवारांना नगरपरिषदेत पाठवा, कारण मालवणचे भविष्य सुधारायचे असेल तर निलेश राणे यांना साथ द्यावी लागेल असे ते म्हणाले
ना.शिंदे म्हणाले की, आमचे मित्रपक्ष म्हणून आपण लोकसभा निवडणुकीत मोदीसाठी आणि विधानसभेत महायुतीसाठी प्रामाणिकपणे काम केले. आमच्या कामाची पोचपावती दिली. पैशापेक्षा माणसं आणि प्रेम किती कमावलं हे महत्त्वाचं आहे.असे ते म्हणाले
सभेत त्यांनी मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या ‘लाडकी बहिण’ योजनेची आठवण करून देत अनेक यशस्वी उदाहरणांची माहिती दिली. यावेळी त्यांनी लाडकी बहिण ही योजना कधीही बंद होणार नाही. असे ठासून सांगताना त्यांनी या राज्याला पुढे नेण्याचं काम आपण केले आणि कोकणावर बाळासाहेब ठाकरे यांचं विशेष प्रेम होतं. या कोकणातील विकास प्रकल्प नारायण राणे यांच्या मुख्यमंत्री काळात आले. आता आपला उद्योगमंत्री उदय सामंत उद्योग वाढवत आहेत, आणि तुमचं एक मत मालवणच्या भविष्याला ठरवणार आहे. माझ्या सोबत निलेश राणे हे मालवणच्या विकासासाठी काम करत आहेत. त्यांना भरघोस निधी दिला जाईल, हा एकनाथ घेणारा नाही, देणारा आहे. विकास आपल्याला मालवणच्या दारावर आणायचा आहे. २०२२ मध्ये जनतेने सरकाराला समर्थन दिले, आणि मला काम करणारा माणूस आवडतो. या मालवणकरांना परिवर्तनाची लाट आणायची आहे.असे ते म्हणाले
ते पुढे म्हणाले, “कोकण हा शिवसेनेचा गड आहे. येथील लोकांचा विश्वास आजही शिवसेनेवरच आहे. विरोधकांनी कामे न केल्यामुळे त्यांचे दशावतार सुरू झाले आहेत अशी घणाघाती टीका करीत शिवसेना नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे यांनी “कुणी कितीही करू देत कल्ला, मालवण राहणार शिवसेनेचाच बालेकिल्ला…!” असेही ते म्हणाले,
यावेळी आम. निलेश राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण आणि मालवणची निवडणुक जास्त गाजतेय, त्याचे कारण काही वेगळ सांगायची गरज नाही. गेल्या दहा वर्षात मालवण कुडाळ मतदार संघाला काही मिळाले नाही. दहा वर्षाचा मोठा बॅकलॉग भरुन काढायचा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते आहे. मालवण आणि कुडाळ शहरचा चेहरा मोहरा ना. शिंदे आपल्या खात्यामार्फत बदलू शकतात. मालवण शहराच्या विकासाचे आणि शहर नीटनेटके ठेवण्यासाठी व्हिजन डॉक्युमेंट आम्ही जनतेसमोर ठेवलेच आहे. दहा वर्षाचा बॅकलॉग ना. शिंदेच भरुन काढू शकतात. ना. शिंदे यांच्याकडे केलेली मागणी पॉझीटिव्ह होऊनच येते. म्हणूनच शहर विकाससाठी नगर विकास खात्याच्या मार्फत जे जे करता येईल ते मी ना. शिंदे यांच्यासमोर ठेवणार आहे.
तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूरला नगरोत्थान मधून सर्वात जास्त निधी मिळतो. मालवणात सर्वात जास्त पर्यटक येतात. त्यामुळे या भागालाही दहा – दहा कोटींचा निधी मिळावा अशी माझी ना. शिंदे यांच्याकडे मागणी आहे, ना. शिंदे यांनी आमच्यावर आशीर्वाद ठेवावा, मतदार संघाला जपण्यासाठी जो विकासनिधी देता येईल तो द्यावां, असेही निलेश राणे म्हणाले.
मालवण नगरपालिकेसाठी आम्ही नवे चेहरे आणि निष्कलंक असे उमेदवार दिले आहेत. माझ्यावर टीका होत असली तरी हरकत नाही, आज मी कोणाची नावे घेणार नाही, मला शहरचा विकास करायचा आहे. किती जरी टीका झाली तरी येणाऱ्या तीन तारीखला सर्वांचे टांगे पलटी होणार, हा ओव्हर कॉन्फिडन्स नाही तर गेले वर्षभर आम्ही चांगले काम केले आहे, म्हणूनच हा विश्वास आम्हाला आहे, असेही आम. निलेश राणे म्हणाले.
गेली दहा वर्षे निलेश राणे कुठेतरी फेकला गेला होता, कोण विचारत नव्हते, लोकांनी ओवाळून टाकला होता, काहींनी आमदारकीचे तिकीट देतो असे सांगितले, मात्र नंतर ते कुठेच दिसले नाहीत. मात्र मला संधी देण्याची तयारी ना. एकनाथ शिंदे यांनी दाखवली. कुठेही गेलास तरी तुझे शंभर टक्के योगदान दे अशी शिकवण आणि आशीर्वाद मला नारायण राणे यांनी दिले आहेत. म्हणूनच शेवटच्या श्वासापर्यंत मी एकनाथ शिंदे यांच्या सोबत राहणार आहे. त्यांचा पीए बनून राहण्यासही मी तयार आहे, असेही आम. निलेश राणे म्हणाले.
मागच्या काळात कोणी लुटालूट केली हे जनतेला माहित आहे. दहा वर्षात विधी मंडळाला कळलेच नाही की मालवण कुडाळ हा पण एक मतदार संघ आहे, मात्र आता मालवण कुडाळ साठी न्याय मागायचा आहे. म्हणूनच आज लोकांना गर्व वाटवा असे काम मी करत आहे. माझ्याकडून जिल्ह्याचा व या मतदार संघाचा अपमान मी कधी होऊ देणार नाही, येथील जनतेची मान झुकेल असे काम कधीही करणार नाही, तुम्हाला खिशात हात घालावा लागेल असे काम आमचे नगरसेवक करणार नाहीत, तसे झाले तर तुमच्यासमोर नाक घासेन, असेही आम. निलेश राणे म्हणाले.
विरोधकांकडून आम. राणे यांना घेरण्याचा प्रयत्न – दत्ता सामंत
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत म्हणाले, कुडाळ मालवण मध्ये माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या नंतर सन २०२४ मध्ये निलेश राणे यांनी दुसरी इनिंग सुरू केली आहे, त्यांच्या कामामुळे विरोधक त्यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत, एका हुशार आणि बुद्धीवान आमदाराला रोखण्याचा प्रयत्न सुरु आहे. आम. राणे मालवणी शहराच्या विकासाचे व्हिजन घेऊन काम करत आहेत. आमच्या उमेदवारांनी भ्रष्टाचार मुक्त कारभाराची शपथ घेतली आहे. आता शिवसेना उमेदवार व नगराध्यक्ष यांना जनतेने साथ देवून आ.निलेश राणे या उच्चशिक्षित नेतृत्वाचे हात बळकट करा असे आवाहन केले.
यावेळी ओरोस येथील उबाठा मधील नागेश ओरोसकर सह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी संजय पडते, काका कुडाळकर,महेश कांदळगावकर, राजा गावकर, दादा साईल आदींनी मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन अक्षय सातार्डेकर यांनी केले

