*कोंकण एक्सप्रेस*
*मालवणच्या विकासाचा अष्टसूत्री संकल्प या व्हिजन डॉक्युमेंटचे आमदार निलेश राणे यांच्याकडून सादरीकरण*
*मालवण : प्रतिनिधी*
चार दिवसापूर्वी मालवणचे आमदार निलेश राणे यांनी मालवणच्या शिवसेना मेळाव्यात जाहीर केल्याप्रमाणे काल रात्री मालवणातील नागरिकांच्या बैठकीत विकासाचे रोल मॉडेल सादर करताना आमदार राणे यांनी शहर विकासाचा अष्टसूत्री संकल्प जाहीर केला यामध्ये मालवणातील ऐतिहासिक पर्यटन आणि वारसा जतन, मालवण मरीन ड्राईव्ह आणि आधुनिक शहर संकल्पना, पायाभूत सुविधा व जलव्यवस्थापन, स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन, वाहतूक व दळणवळण, शिक्षण कौशल्य आणि रोजगार निर्मिती, कला मनोरंजन आणि क्रीडा त्याचप्रमाणे पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन अशी अष्टसूत्री मांडताना आमदार राणे यांनी मालवण शहर हे जागतिक दर्जाचे शहर बनविण्याचा आपला संकल्प असल्याचे जाहीर केले
आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतील मालवण शहरातील अष्टसूत्री संकल्प या व्हिजन डॉकयुमेंटचे सादरीकरण व नागरिकांशी चर्चासत्र या कार्यक्रमाचे आयोजन मालवण बाजारपेठ येथील हॉटेल मालवण हेरिटेज येथे नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा समन्व्यक महेश कांदळगावकर, व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरूरकर, जेष्ठ डॉक्टर शशिकांत झाट्ये, डॉ. राहुल वालावलकर, डॉ. अजित लिमये, डॉ. अविनाश झाट्ये, व्यापारी नितीन तायशेट्ये, शिवसेना सरचिटणीस दादा साईल, संजय पडते, नगराध्यक्षा उमेदवार सौं. ममता वराडकर, शहर प्रमुख दिपक पाटकर, शहर प्रमुख पुनम चव्हाण, शिवसेना नगरसेवक उमेदवार यांसह नाना साईल, राजन सरमळकर, विलास सामंत, दामू तोडणकर, राजा गांवकर, अभय कदम, विश्वास गावकर, किसन मांजरेकर, रोटरी क्लब, लायन्स क्लब पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक व अन्य उपस्थित होते.
यावेळी पाच वर्षात मालवण शहर विकासासाठी शिवसेना काय करणार ? हे अष्टसूत्री संकल्प या व्हिजन डॉकयुमेंटचे सादरीकरणाद्वारे मांडण्यात आले आहे.
यावेळी आमदार निलेश राणे यांनी दर्जेदार वैद्यकीय सेवा, प्रायमरी हेल्थ केअर सेंटर, सोबतच मालवणला जोडणारे प्रमुख रस्ते सातत्याने खड्डेमय होत असतात. यावर उपाय म्हणून त्याची सॉईल टेस्ट करून दर्जेदार रस्ते बांधणी सुरु करण्यात आली आहे. भूमिगत विज वाहिन्या, सबस्टेशन, ट्रान्सफार्मर या माध्यमातून विजेचा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. एकूणच विकास होत असताना कुठल्याही घराला, नागरिकाला बाधा येणार नाही हेच आपले प्रयत्न राहतील. दर्जेदार शहर बनत असताना याठिकाणी ड्रग्स कल्चरला थारा नसेल. एक आदर्श मालवण शहर बनविले जाईल असे स्पष्ट केले.

