गोवा येथील दोन एल.ई.डी. नौकांवर मालवण किनारपट्टीवर कारवाई

गोवा येथील दोन एल.ई.डी. नौकांवर मालवण किनारपट्टीवर कारवाई

*कोंकण एक्सप्रेस*

*गोवा येथील दोन एल.ई.डी. नौकांवर मालवण किनारपट्टीवर कारवाई*

*मालवण : प्रतिनिधी*

गोवा येथील दोन एल.ई.डी. नौकांवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने मालवण किनारपट्टीवर कारवाई केली असून मत्स्य व्यवसाय विभागाने या दोन्ही नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात ठेवल्या आहेत. तर नौकेवर असणारे लाईट व लाईट पुरवणारी उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.

गुरुवार २७ रोजी रात्री ९ ते १० च्या दरम्याने देवबाग, मालवण समोर मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी श्री. गणेश टेमकर, सहाय्यक मत्स. विकास अधिकारी (परवाना अधिकारी), मालवण हे नियमित गस्त घालत होते. यावेळी गोवा राज्याच्या असलेल्या नौका सैम मिगेल नों. क्र.- IND-GA-१-MM-३५३६ व गंगा-९ नों. क्र.- IND-GA-१-MM-३९४१ द्वारे महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात मालवण किल्ल्यासमोर अंदाजे ८ ते ९ सागरी मैल येथे अनधिकृतरित्या एल.ई.डी. लाईट व्दारे मासेमारी करत असताना पकडले.

या दोन्ही नौकांवर नौका तांडेलसह एकूण ५२ खलाशी आहेत. सदर नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात ठेवण्यात आल्या आहेत. नौकेवर असणारे लाईट व लाईट पुरवणारी उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.

अंमलबजावणी अधिकारी श्री. गणेश टेमकर, सहाय्यक मत्स. विकास अधिकारी (परवाना अधिकारी), मालवण यांनी मालवण पोलिस ठाणे येथील पोलिस कर्मचारी श्री. मेखी तसेच सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व सागरी सुरक्षा रक्षक मालवण यांचे सहकार्याने सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई केली आहे.

अंमलबजावणी अधिकारी यांनी प्रतिवेदन दाखल केल्यानंतर सदर नौकेबाबत सुनावणी मा. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांचे कोर्टात ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती मत्स्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!