*कोंकण एक्सप्रेस*
*साटेली गावात पांडवकालीन शिवलिंग–नंदी मूर्ती प्रतिष्ठापना; भक्तीमय वातावरणात मंगल सोहळा…*
*दोडामार्ग: शुभम गवस*
पांडवकालीन इतिहासाची साक्ष असलेल्या साटेली गावात पुरातन शिवलिंग आणि नंदी मूर्तीची प्रतिष्ठापना गुरुवारी ठरलेल्या शुभमुहूर्तावर होत असून, संपूर्ण गाव भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाले आहे. गेले दोन दिवस शेकडो ग्रामस्थ या धार्मिक विधींमध्ये सहभागी होत असून, गावात उत्साह व आध्यात्मिक उर्जा ओतप्रोत भरलेली दिसून येत आहे.
बुधवारी सकाळी गावातील शेकडो सुहासिनी महिलांनी नऊवारी साडी परिधान करून ढोलताशांच्या गजरात आणि देवतांच्या अवसारांसह गंगा पूजनासाठी पारंपरिक विहिरीवर प्रस्थान केले. गणेशोत्सवात गौरी आणाव्यात, अशा पारंपरिक रीतीने महिलांनी विहिरीवर विधीवत पूजाअर्चा करून पवित्र गंगाजल तांब्याच्या कलशात भरले. त्यानंतर गंगाजलाची भव्य मिरवणूक काढत सातेरी मंदिरात आगमन झाले.
यानंतर शिवलिंग, नंदी मूर्ती आणि कलशावर जलाभिषेक व जलधिवास विधी पार पडले. ब्राह्मण करवीसह इतर प्रमुख धार्मिक विधी देखील मोठ्या भक्तिभावाने पार पाडण्यात आले., सकाळी ठीक ११.१० वाजता शिवलिंग–नंदी मूर्ती प्रतिष्ठापना होणार असून, यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. अनेक गावातील ग्रामस्थ, मानकरी व शेजारील गावांतील भाविकांना निमंत्रण देण्यात आले आहे.
कित्येक दशकांनंतर पारंपरिक शिवलिंग–नंदी मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा पाहण्याचे भाग्य साटेली ग्रामस्थांना लाभत असून, हा सोहळा गावाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासातील महत्त्वाचा क्षण ठरणार आहे..

