*कोंकण एक्सप्रेस*
*तळेरे येथे 26 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन : सुनील तळेकर स्मृती दिनाचे औचित्य*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
तळेरे येथील निस्वार्थ समाजसेवक स्व. सुनील तळेकर यांच्या 28 व्या स्मृतिदिनानिमित्त 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर तळेरे येथील विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी आदर्श महाविद्यालय येथे होणार आहे. या शिबिरामध्ये रक्तदात्यांनी सहभागी होऊन यशस्वी करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
हे शिबिर जिल्हा रक्तपेढी सिंधुदुर्ग यांच्या सहकाऱ्याने स्व. सुनिल तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट तळेरे, स्व. सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालय, तळेरे आणि विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी आदर्श महाविद्यालय, तळेरे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले आहे. बुधवारी सकाळी 9 वाजता या शिबिराचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होईल. त्यानंतर रक्तदान शिबिराला प्रारंभ होईल.
या ट्रस्ट कडून दरवर्षी विविध सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा उपक्रम आयोजित केले जातात. तर वर्षातून दोनवेळा रक्तदान आयोजित करून दशक्रोशीतील गरजू रुग्णांना रक्तपिशवीसाठी मदत केली जाते. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी रक्तदात्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

