उच्च शिक्षणाच्या गुणवत्ता वृद्धीसाठी प्रगत पायाभूत सुविधा उभारणार-डॉ.बोंदर

उच्च शिक्षणाच्या गुणवत्ता वृद्धीसाठी प्रगत पायाभूत सुविधा उभारणार-डॉ.बोंदर

*कोंकण एक्सप्रेस*

*उच्च शिक्षणाच्या गुणवत्ता वृद्धीसाठी प्रगत पायाभूत सुविधा उभारणार-डॉ.बोंदर*

*वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव)*

वेंगुर्ला येथे असलेल्या शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर संचलित प्रियदर्शनी मुलींच्या वसतिगृहाला कोकण विभागाचे सहसंचालक (उच्च शिक्षण) डॉ.किरणकुमार बोंदर यांनी सदिच्छा भेट देऊन वसतिगृहातील विविध सुविधांची सखोल पाहणी केली. तसेच कोकण विभागात उच्च शिक्षणाच्या गुणवत्ता वृद्धीसाठी आम्ही भविष्यात अधिक प्रगत पायाभूत सुविधा उभारण्यासाठी प्रयत्नशील राहू असे आश्वासन डॉ.बोंदर यांनी दिले.
या भेटी दरम्यान, डॉ. बोंदर यांनी निवासकक्ष, अभ्यास कक्ष, ग्रंथालय, भोजनालय, स्वच्छता व्यवस्था, सुरक्षतेसाठी बसविलेली सीसीटीव्ही यंत्रणा, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांसाठी उपलब्ध असलेल्या सुविध यांचा तपशीलवाद आढावा घेतला. तसेच विद्यार्थीनींना आणखी सक्षम आणि सुरक्षित वातावरण प्राप्त होण्यासाठी वसतिगृहाच्या अधिक्षिका महिमा घाडी यांच्याशी चर्चा केली. दरम्यान, वसतिगृहात उपलब्ध असलेला दर्जेदार वातावरणात आणखी भर घालण्यासाठी आणि मार्गदर्शन कक्षाच्या बळकटीकरणासाठी डिजिटल संसाधनांची गरज असल्याचे श्रीमती घाडी यांनी सांगितले.
वसतिगृहाचे व्यवस्थापक सुरेंद्र चव्हाण यांनी वसतिगृहात राबविण्यात येणा-या व्यक्तिमत्व विकास उपक्रम, आरोग्य तपासणी शिबिरे, कौशल्याधारीत कार्यशाळा आणि विद्यार्थिनींच्या सर्वांगिण विकासासाठी होत असलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची माहिती दिली.
उच्च शिक्षणातील नव्याने उपलब्ध होत असलेल्या संधी, नोकरीसाठी आवश्यक कौशल्ये, करिअर नियोजनाचे महत्त्व, महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाची गरज या विषयांवर डॉ.बोंदर यांनी विद्यार्थीनींना मार्गदर्शन केले. तर विद्यार्थीनींनीही आपल्या शंकांचे निरसन केले.
या प्रसंगी बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनराज गोस्वामी, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, डॉ.बी.जी.गायकवाड, शिक्षण प्रसारक मंडळाचे इतर प्रतिनिधी, कार्यालयीन कर्मचारी आणि वसतिगृह कर्मचारी उपस्थित होते. तसेच संस्थेचे सचिव प्रा.जयकुमार देसाई, चेअरपर्सन डॉ. मंजिरी मोरे-देसाई आणि पेट्रन कौन्सिल सदस्य दौलतराव देसाई यांनीही वसतिगृहाच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!