*कोंकण एक्सप्रेस*
*साटेलीमध्ये पांडवकालीन शिवलिंग मंदिराचा जीर्णोद्धार ; २७ नोव्हेंबरला शिखरकलश प्रतिष्ठापना सोहळा*
*२५ ते २७ नोव्हेंबरदरम्यान धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल ; धार्मिक कार्यक्रमांची जय्यत तयारी*
*दोडामार्ग : प्रतिनिधी*
दोडामार्ग पांडवकालीन इतिहास लाभलेल्या साटेली गावातील ग्रामदेवता श्री देवी सातेरी मंदिर परिसरात २७ नोव्हेंबर रोजी पुरातन शिवलिंग मंदिराचा जीर्णोद्धार व शिखरकलश प्रतिष्ठापना सोहळा भव्य उत्साहात पार पडणार आहे. या पारंपरिक धार्मिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर २५ ते २७ नोव्हेंबरदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून तयारीला वेग आला आहे.
सातेरी मंदिर परिसरात साफसफाई, मंडप उभारणी, सजावट यासह सर्व कामे जलद गतीने सुरू आहेत. देवस्थान समिती व ग्रामस्थ एकत्रितपणे घराघरांत जाऊन निमंत्रणे देत आहेत. या सोहळ्यास सर्व भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.
साटेली सातेरी मंदिर परिसरात पांडवकालीन शिवलिंग, नंदी व जुनी मंदिरे असल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. या ठिकाणी नवीन मंदीर बांधून देवतांच्या मूर्तींची पुनःप्रतिष्ठापना करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे.
२५ नोव्हेंबरपासून धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होणार असून यात गणपती पूजन, श्राद्धांत, पुण्याहवाचन, प्राकार शुद्धी, देवतांचे शुद्धीकरण, अभिषेक इत्यादी कार्यक्रम होणार आहेत. २६ नोव्हेंबरलाही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
२७ नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजता मुख्य सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. शिखरकलश प्रतिष्ठापना, महादेव लिंगस्थापना (११.१० वा.), महापूजा, बलिदान, आरती, गार्हाणे व दर्शन सोहळ्यानंतर महाप्रसादाचे आयोजन आहे. तसेच राजी संत बाळूमामा यांच्या जीवनावर आधारित दशावतार नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे.
गेल्या दहा-बारा दिवसांपासून गावात उत्साहात तयारी सुरू असून मंदिर परिसर स्वच्छ व सुंदर करण्यात आला आहे. या धार्मिक सोहळ्याच्या निमित्ताने गावात मांसाहार व मद्यपानावर निर्बंध घालण्यात आले आहेत. गावातील सर्वजण शाकाहाराचे पालन करत असून समस्त ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे.

