खारेपाटण महाविद्यालयात कृषी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

खारेपाटण महाविद्यालयात कृषी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

*कोंकण एक्सप्रेस*

*खारेपाटण महाविद्यालयात कृषी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न*

जिल्ह्यातील खारेपाटण येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी कल्याण समिती, वनस्पतिशास्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष तसेच आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महाविस्तार एआय ॲप’ च्या माध्यमातून कृषी विषयक मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी अत्यंत माहितीपूर्ण ठरला.

कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. अर्जुन जाधव, मंडळ कृषी अधिकारी, तरळे यांनी उपस्थित राहून आधुनिक शेतीतील तांत्रिक बदल, स्मार्ट शेती साधने, कीड व्यवस्थापन पद्धती, उत्पादनवाढीतील नवउपक्रम आणि शेतकऱ्यांसाठी उपलब्ध शासनाच्या विविध सुविधा याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांचे व्यावहारिक अनुभव आणि तंत्रज्ञानाधारित मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरले. तसेच कृषी सहाय्यक श्री. सागर चव्हाण यांनी कृषी क्षेत्रातील करिअरच्या संधी, शैक्षणिक पर्याय, कृषी उद्योजकता, विविध योजना आणि ग्रामीण रोजगार क्षेत्रातील नव्या दिशांवर प्रकाश टाकला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये कृषी क्षेत्राबद्दलचा उत्साह अधिक वृद्धिंगत झाला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आत्माराम कांबळे उपस्थित होते. आजीवन अध्ययन व विस्तार विभाग प्रमुख प्रा. माधवी पांचाळ, प्रा. डॉ. वंदना शिंदे, प्रा. गजानन व्हंकळी, प्रा. विघ्नेश सावंत, प्रा. नमिरा मुजावर, प्रा. प्रज्योत नलावडे तसेच प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग हा कार्यक्रम अधिक प्रभावी ठरवणारा होता.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. कांबळे यांनी विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रातील नव्या संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले. प्रा. गजानन व्हंकळी यांनी उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांचे आभार मानले.
कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. माधवी पांचाळ यांनी तर सूत्रसंचालन एनएसएस विभागप्रमुख देसाई मॅडम यांनी केले.

हा उपक्रम कृषीविषयक ज्ञानवृद्धी, नवकल्पनांचा प्रसार आणि ग्रामीण विकासाची दिशा दर्शवणारा ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!