*कोंकण एक्सप्रेस*
*चिपळुणात गुडघा प्रत्यारोपणातील यश; ७० वर्षीय रुग्ण १२ तासांत चालू लागला*
*चिपळूण : प्रतिनिधि*
लाईफ केअर हॉस्पिटल येथे ९ नोव्हेंबर रोजी एका ७० वर्षीय रुग्णावर डाव्या गुडघ्याचे सांधेरोपण (knee replacement) शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली. विशेष म्हणजे शस्त्रक्रियेनंतर अवघ्या १२ तासांतच रुग्ण स्वतःच्या पायावर उभा राहून वॉकरच्या साहाय्याने चालू लागला. ही शस्त्रक्रिया प्रख्यात अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. नोमान अत्तार(Joint Replacement & Spine Surgeon) यांनी अत्याधुनिक सबवास्टस अप्रोच पद्धतीचा वापर करून केली. पारंपारिक पद्धतीत २० ते २५ सेमी लांबीचा छेद द्यावा लागतो; मात्र या पद्धतीत केवळ ८ ते १० सेमीचा छोटा छेद दिला जातो आणि मांडीचे स्नायू न कापता शस्त्रक्रिया केली जाते. त्यामुळे स्नायूंवरील ताण कमी होतो, रक्तस्त्रावही अत्यल्प होतो आणि रुग्णाला होणाऱ्या वेदनाही कमी जाणवतात. या तंत्रामुळे रुग्ण त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी चालू शकतो, तसेच सांध्यांच्या हालचाली लवकर सुरू होतात. त्यामुळे तीन ते चार आठवड्यांच्या आत रुग्ण पूर्ववत हालचाल करू शकतो. दवाखान्यात राहण्याचा कालावधी आणि औषधांची आवश्यकता देखील तुलनेने कमी लागते, असे डॉ. अत्तार यांनी सांगितले. चिपळूण परिसरातील नागरिकांना नवीनतम तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा आणि जागतिक दर्जाची उपचारपद्धती उपलब्ध व्हावी हा आपला ध्यास असल्याचे त्यांनी नमूद केले. या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर समाजातून डॉ. अत्तार यांच्या कार्याचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.
अधिक माहितीसाठी डॉ. अत्तार ऑर्थोपेडिक आणि फिजिओथेरपी सुपर स्पेशालिटी क्लिनिक, शिवनदी ब्रिज, खेडेकर क्रीडा संकुल मागे, देसाई मोहल्ला, चिपळूण येथे संपर्क साधावा.

