*कोंकण एक्सप्रेस*
*_जिल्ह्यात कुष्ठरोग शोध मोहीम : १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर_*
*घरोघरी येणाऱ्या आरोग्य पथकास सहकार्य करा*
*- जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे*
*सिंधुदुर्गनगरी, दि. १७ (जिमाका)*
जिल्ह्यात आजपासून २ डिसेंबरपर्यंत कुष्ठरोग शोध मोहीम राबविण्यात येत असून, आरोग्य पथके घरोघरी भेट देऊन सर्वेक्षण करणार आहेत. नागरिकांनी या पथकांना सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी सांगितले की, “कुष्ठरोग निर्मूलनासाठी समाजात जागृती होणे अत्यावश्यक आहे. *शून्य कुष्ठरोग प्रसार* हे उद्दिष्ट गाठण्यासाठी आरोग्य विभाग सातत्याने प्रयत्न करीत आहे. या मोहिमेदरम्यान आरोग्य पथक घरी आल्यानंतर तपासणी करून घेऊन त्यांना पूर्ण सहकार्य करावे.” तसेच काही संशयास्पद लक्षणे आढळल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात, ग्रामीण रुग्णालयात किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयात त्वरित संपर्क साधावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या पंधरवड्यात आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका व स्वयंसेवक घराघरांत जाऊन कुष्ठरोगाची लक्षणे तपासून पाहणार आहेत. विशेषतः जोखीमग्रस्त व दुर्गम भागांतील नागरिकांपर्यंत पोहोचून लक्षणांची ओळख, वेळेवर उपचार, रोगप्रसार रोखणे आणि सामाजिक भेदभाव कमी करणे हा मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना या उपक्रमात सक्रिय सहकार्य करून आरोग्यदायी व कुष्ठमुक्त सिंधुदुर्गासाठी हातभार लावण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

