*कोंकण एक्सप्रेस*
*ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली एसटीच्या विभागीय नियंत्रकांची भेट*
*सादर केले समस्यांचे पत्र, व्यक्त केली सुधारणांची अपेक्षा*
*कणकवली ः संजना हळदिवे*
ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या कणकवली शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक, श्री दीपक घोडे यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे आणि समस्यांचे पत्र दिले. नूतन विभागीय नियंत्रक यांची भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पत्रातील मुद्द्यांवर पदाधिकाऱ्यांनी विभाग नियंत्रक यांच्याशी चर्चा केली. यावेळी विभाग नियंत्रक यांनी काही मुद्द्यांची पूर्तता करणेबाबत संबंधितांना समक्ष सूचना दिल्या यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा कणकवलीच्या अध्यक्ष श्रद्धा कदम , सचिव पूजा सावंत, कोषाध्यक्ष राजन भोसले, जिल्हा महिला संघटक रीमा भोसले, सहसंघटक सुभाष राणे, सदस्य कृष्णकांत दळवी व सदस्य सखाराम सपकाळ उपस्थित होते.
विभाग नियंत्रण यांना देण्यात आलेल्या पत्रामध्ये पुढील मुद्द्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. सर्व रा.प. वाहनांना फक्त सर्व्हिस रोडनेच मार्गक्रमण करण्याची परवानगी असताना प्रवाशांची गैरसोय करून महामार्ग पुलावरुन जलद व काही इतर फेऱ्या ये-जा करतात. प्रवाशांना घेतले जात नाही. उदा. कसाल, ओरोस, पणदूर, नांदगांव.
सुट्टया पैशांअभावी प्रवासी आणि वाहकाचे वाद होतात. वाहकाचे अग्रधन देताना सुट्टया पैश्यात वाहकाकडे देण्यात यावे.
सामान ठेवण्याच्च्या डिकीची चावी गाडीच्या चालक / वाहकाकडे नसते. मार्गातील प्रवाशांची गैरसोय होते.
कुडाळ-विजापूर फेरीस प्रवासी गर्दी अमाप असते. प्रवाशांचे सामानही जास्तच असते. नवीन ताफ्यातील लालपरी बस लावण्यात यावी. तसेच प्रवासी गर्दीमुळे आणखी कणकवली-मिरज फेरीची आवश्यकता आहे.
गाडी फलाटला लागताच वाहकाने बस फेरीच्या मार्गाबाबत माहिती द्यावी. गाड्यांचे मार्गफलकाचे काही वेळा आकलन होत नाही.
प्रवाशांना लांबपल्ल्यावरील बस येणार की नाही किंवा कधी येणार याची प्रवाशांना माहिती दिली जात नाही. मार्गात कुठे आहे? कधी येण्याची शक्यता आहे ? याची वाहतूक नियंत्रण कक्षातून माहिती द्यावी. म्हणजे प्रवासी निर्धास्त थांबतील.
स्थानकावरील जाहिरात व ध्वनीक्षेपकाचा आवाज मोठा गोंगाटाचा असतो. ध्वनीप्रदूषण होऊन प्रवासी आरोग्यास धोका निर्माण होतो.
कणकवली येथील प्रवासी प्रसाधन गृहाकडे जाताना अडचणीचे झालेले आहे. तसेच दुर्गंधी झालेली आहे.
यामध्ये सुधारणा करण्यात याव्यात अशी विनंती ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.

