*कोंकण एक्सप्रेस*
*गवाणे येथील उदय आयरे यांना कोकणरत्न पदवी – २०२५ जाहीर*
*आयरे यांच्या पखवाज वादनातील योगदानाची दखल*
*कासार्डे प्रतिनिधी ; संजय भोसले*
देवगड तालुक्यातील गवाणे येथील प्रख्यात पखवाज वादक उदय आयरे यांना स्वतंत्र कोकणराज्य अभियान तर्फे दरवर्षी प्रदान करण्यात येणारी मानाची “कोकणरत्न” पदवी २०२५ यंदा जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या चार दशकांहून अधिक काळाच्या अतुलनीय पखवाज साधना, राष्ट्रीय स्तरावरील वादन सादरीकरणे, अनेक पुरस्कारांनी सन्मानित कार्य आणि पखवाज शिक्षणक्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे.
उदय आयरे हे पखवाज क्षेत्रात गेली ३५ वर्षे समर्पित कार्यरत असून, आज २०० पेक्षा अधिक विद्यार्थी त्यांच्याकडून पखवाज शिकत आहेत. विरार, भांडुप, दहिसर आणि लालबाग येथे त्यांचे पखवाज वर्ग यशस्वीपणे सुरू असून या माध्यमातून अनेक तरुण कलावंत घडत आहेत.
त्यांनी महाराष्ट्रातील अनेक दिग्गज गायकांना पखवाज साथ दिली असून संपूर्ण महाराष्ट्रभर शेकडो कार्यक्रमांतून आपल्या वादनकौशल्याची छाप उमटवली आहे. भजन स्पर्धांमध्ये ८० पेक्षा अधिक प्रथम पारितोषिके पटकावण्याचा त्यांचा विक्रम आहे. अनेक भजन स्पर्धांचे परीक्षक म्हणूनही त्यांनी आपली कला आणि जाणिवेचा ठसा उमटवला आहे

