*कोंकण एक्सप्रेस*
*पत्रकारांची बदनामी करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई व्हावी ; दोडामार्गात पत्रकारांचा ठाम पवित्रा*
*व्हाईस ऑफ मीडिया संघटनेची दोडामार्ग पोलीस स्टेशनला तक्रार*
*दोडामार्ग :शुभम गवस*
पत्रकारांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारी सोशल मीडियावरील कृती कधीच सहन केली जाणार नाही, असा ठाम पवित्रा व्यक्त करत ‘व्हाईस ऑफ मीडिया’ व इतर डिजिटल मीडिया पत्रकारांनी दोडामार्ग पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दाखल केली आहे.
दिनांक १० नोव्हेंबर रोजी “संदेश वरक मिञ मंडळ” या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये एका इसमाने पत्रकारांविरोधात अपमानास्पद, खोटी आणि बदनामीकारक पोस्ट प्रसारित केली. या पोस्टमुळे समाजामध्ये पत्रकारांविषयी गैरसमज निर्माण होऊन त्यांच्या व्यावसायिक प्रतिष्ठेला धक्का बसला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सदर कृती भारतीय दंड संहिता कलम 499, 500 तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम, 2000 अंतर्गत गुन्हा ठरतो. त्यामुळे संबंधित इसमावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या प्रसंगी व्हाईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष भूषण सावंत, कार्यकारिणी सदस्य प्रथमेश गवस, तालुकाध्यक्ष बुधाजी (आपा) राणे, सचिव प्रतिक राणे, पत्रकार प्रमोद गवस, गोविंद शिरसाट आदी उपस्थित होते.
यावेळी उपनिरीक्षक नरेंद्र पाटील यांनी तक्रार स्वीकृत करून संबंधित इसमावर आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

