वेंगुर्ले न.प. निवडणूक : पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल नाही ; प्रशासन सज्ज

वेंगुर्ले न.प. निवडणूक : पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल नाही ; प्रशासन सज्ज

*कोंकण एक्सप्रेस*

*वेंगुर्ले न.प. निवडणूक : पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल नाही ; प्रशासन सज्ज*

*वेंगुर्ले ः प्रथमेश गुरव*

वेंगुर्ले नगरपरिषद निवडणूक २०२५ साठी नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया आज सोमवार १० नोव्हेंबर पासून सुरू झाली असली, तरी पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल न झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. निवडणूक पारदर्शकतेने व्हावी यासाठी नगरपरिषद कार्यालयात स्वतंत्र निवडणूक कक्षाची व्यवस्था करण्यात आली असून,निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज आहे.
उमेदवारांकडून नामनिर्देशन पत्रांसाठी लागणारी कागदपत्रे गोळा करण्यासाठी धावपळ दिसून येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरल्यानंतर उमेदवारांनी तो नगरपरिषद कार्यालयातील निवडणूक कक्षात दाखल करायचा आहे.
नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवार, १७ नोव्हेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. रविवारी सुट्टीचा दिवस वगळता उमेदवारांना अर्ज दाखल करण्याची संधी उपलब्ध राहणार आहे. वेंगुर्ले नगरपरिषद निवडणुकीसाठी तहसीलदार ओंकार ओतारी यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून, तर मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी १८ नोव्हेंबर रोजी होणार असून, त्यानंतर अधिकृत उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. यानंतर २ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक प्रक्रियेचा पहिला दिवस शांततापूर्ण पार पडला असून, आगामी दिवसांत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया गती घेणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!