*कोंकण एक्सप्रेस*
*ॲड ऐश्वर्य मांजरेकर यांचा प्रामाणिकपणा चुकीने खात्यात जमा झालेले ४० हजार रुपये संबंधित व्यक्तीस केले परत*
*मालवण (प्रतिनिधी)*
आजच्या काळात ऑनलाईन व्यवहारांमुळे चुका होण्याचे प्रमाण वाढले असले तरी, अशा प्रसंगी प्रामाणिकतेचे उदाहरण ठेवणारे नागरिक समाजात अजूनही आहेत, याचा प्रत्यय मालवणमध्ये आला आहे.
मालवण तालुक्यातील ॲड ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर यांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया, मालवण शाखेतील खात्यात दिनांक 1 नोव्हेंबर 2025 रोजी सुमारे ₹40,000/- (चाळीस हजार रुपये) इतकी रक्कम ऑनलाईन पद्धतीने जमा झाली.
सदर रक्कम पश्चिम बंगाल येथील व्यक्तीची होती.
सदर रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाल्याचे लक्षात येताच, ॲड ऐश्वर्य मांजरेकर यांनी तात्काळ बँकेच्या शाखा व्यवस्थापकांकडे लेखी अर्ज सादर करून ती रक्कम मूळ खातेदारास परत करण्याची विनंती केली.
“ही रक्कम चुकीने आली असल्याने ती ठेवणे मला योग्य वाटले नाही. त्यामुळे मी स्वतःहून बँकेस रक्कम परत पाठविण्याबाबत अर्ज दिला,” असे ऐश्वर्य मांजरेकर यांनी सांगितले.
बँकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले की, “मांजरेकर यांची कृती समाजासाठी आदर्श ठरावी अशी आहे. आजच्या डिजिटल व्यवहारांच्या युगात अशी प्रामाणिकता दुर्मिळ होत चालली आहे.” तसेच डिजिटल व्यवहार करताना नागरिकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे.
स्थानिक नागरिकांनी त्यांच्या या प्रामाणिक कृतीचे कौतुक केले असून, “चुकीने आलेली रक्कम परत करणे हे खऱ्या अर्थाने सामाजिक जबाबदारीचे व प्रामाणिकतेचे द्योतक आहे,” अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

