*कोकण Express*
*कवी सिद्धार्थ तांबे यांची कविता आजच्या काळाचेच प्रश्न उपस्थित करते.*
*कवी अजय कांडर यांच्या हस्ते* *’सूर्योन्मुख शतकांच्या दिशेने’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन*
*दर्पण प्रबोधिनीतर्फे प्रकाशन सोहळ्याचे आयोजन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कवी सिद्धार्थ तांबे यांच्या ‘सूर्योन्मुख शतकाच्या दिशेने’ काव्यसंग्रहातील कविता नेमके आजच्या काळातील प्रश्न उपस्थित करते. त्यामुळे ती समकाळाचा शोध घेताना जातिअंताला आणि बहुजन सांस्कृतिक राजकारणाला बळ देतानाच वाचकालाही अंतर्मुख करते. त्यामुळे त्यांची कविता कोकणात आज लिहिल्या जाणाऱ्या कवितेमध्ये अगदी वेगळी ठरते असे प्रतिपादन नामवंत कवी अजय कांडर यांनी पिसेकमते येथे केले.
कोकणच्या परिवर्तन चळवळीतील क्रियाशील कार्यकर्ते कवी सिद्धार्थ तांबे यांच्या हेतकरर्स प्रकाशन मुंबईतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘सूर्योन्मुख शतकाच्या दिशेने’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन पिसेकमते येथे कवी अजय कांडर यांच्या हस्ते करण्यात आले तर याचवेळ या संग्रहाचे ऑनलाईन प्रकाशन मुंबई येथे ज्येष्ठ समीक्षक मोतीराम कटारे आणि कवी सुनिल हेतकर, कवी मोहन शिरसाट, कवी प्रा. भास्कर पाटील यांच्या हस्ते आॅनलाईन करण्यात आले. दर्पण प्रबोधनीतर्फे पिसेकमते येथे आयोजित करण्यात आलेल्या या प्रकाशन सोहळ्याला कवी आणि धरणग्रस्तांचे नेते अंकुश कदम, शिक्षक भारती संघटनेचे नेते संजय वेतुरेकर, कवी तथा समाज साहित्य संघटनेचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर, अभिनेते निलेश पवार, दर्पण प्रबोधिनीचे अध्यक्ष राजेश कदम, दर्पण प्रबोधिनीच्या महिला अध्यक्षा स्नेहल तांबे, सुनील तांबे,कवयित्री कल्पना मलये आणि कवी सिद्धार्थ तांबे, सुलभा तांबे आदी उपस्थित होते. यावेळी दर्पण प्रबोधिनीतर्फे देण्यात येणाऱ्या उत्तम पवार स्मृती राज्यस्तरीय काव्य पुरस्काराची उद्घोषणा कवी अजय कांडर यांनी करून वाशिम येथील कवी शेषराव पिराजी धांडे यांच्या ‘बिघडलेले होकायंत्र’ या काव्यसंग्रहाला तो जाहीर केला. रोख रक्कम पाच हजार आणि दर्पण सन्मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून या पुरस्कारासाठी अर्थसहयोग देणाऱ्या स्नेहल सुनिल तांबे यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
अंकुश कदम म्हणाले सिद्धार्थ तांबे हे आमच्या बरोबरचे कवी. 90 नंतर सिंधुदुर्गात जी पिढी लिहू लागली त्यातील एक प्रमुख नाव म्हणजे सिद्धार्थ. तरीही त्यांचा दहा वर्ष उशिरा काव्यसंग्रह प्रसिद्ध होत आहे. यामागे सांस्कृतिक राजकारण आहे. आणि ते कसं असतं हे आपण समजून घ्यायला हवं. आज कधी नव्हे एवढा काळ आपल्यावर कोसळतो आहे.पण अशा काळातही क्रांति व्हायचे असेल तर आपल्याला कवितेकडेच वळावं लागतं. फैज अहमद फैज यांच्या एका कवितेने पाकिस्तान मध्ये क्रांती केली. आणि त्या कवितेवर बंदी आणली गेली. आणि तीच कविता शेवटी क्रांतीसाठी भारतातही गायली गेली.यादृष्टीने सिद्धार्थ यांच्या सदर काव्यसंग्रहातील कवितेचा विचार करताना त्यांनी आजच्या वातावरणात संदर्भात अनेक प्रश्न आपल्या कवितेतून उपस्थित केले आहेत आणि खरंतर प्रश्न उपस्थित करणे हेच कवीच काम असत.
श्री वेतुरेकर म्हणाले सिद्धार्थ हे चळवळीतील एक प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. हा अनुभव आम्ही ते आमच्या सोबत शिक्षक भारतीत काम करताना घेतला आहे. ते वरवर शांत वाटत असले तरी त्यांना अनेक गोष्टीचा त्यांना त्रास होत असतो.त्यामुळेच त्यानी या संग्रहाच्या माध्यमातून अस्सल कविता दिली आहे.त्यांच्या कवितेचा भविष्यकाळ उज्वल असून त्यांच्यासोबत आम्ही सदैव असू.
श्री कटारे म्हणाले, सिद्धार्थ यांच्या या कवितासंग्रहात बुद्ध इतिहासाचा मागोवा दिसतो तर विचारस्वातंत्र्यावर हल्ला करू पाहणा-या विरोधकांना आव्हान आढळते. सुनिल हेतकर म्हणाले करोना महामारीच्या आव्हानात्मक परिस्थितीत हा संग्रह काढला गेलाय. हेतकरर्स पब्लिकेशनने हे आव्हान समर्थपणे पेलले आहे. याचा विश्वास या संग्रहाच्या अल्पावधीतील निर्मितीतून आला. या संग्रहाकडे एका चळवळीतील कार्यकर्त्याचं मनोगत व वाटचाल म्हणून पाहताना एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून सिद्धार्था यांच सामान्य माणसांच्या मूलभूत प्रश्नांवरील भाष्य विचारात घ्यायला हवं .
सिद्धार्थ तांबे, म्हणाले मी तीस वर्ष कविता लिहीत आहे. परंतु मला कवी म्हणून सतत पुढे जावे असं कधी वाटले नाही. कारण मी आधी कार्यकर्ता आहे. मला कुठल्याही प्रतिष्ठेचा मोह झाला नाही.म्हणून कदाचित हा माझा संग्रह उशिरा निघत असेल पण या सगळ्या माझ्या वाटचालीत कवी आबा शेवरे, कवी उत्तम पवार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिवर्तन चळवळीतील साहित्यिक यांच्या प्रोत्साहनामुळे मी लिहीत राहिलो. यावेळी मधुकर मातोंडकर, मोहन शिरसाट, भास्कर पाटील, सुनील तांबे, कल्पना मलये यांनीही विचार व्यक्त केले.प्रास्ताविक राजेश कदम यांनी केले. सूत्रसंचालन निलेश पवार यांनी केले.आभार अनिल तांबे यांनी मानले.