*कोकण Express*
*एस. टी. च्या परवानाधारक शुल्कामध्ये ७५ टक्के सवलतीची मागणी*
*परिवहनमंत्री आणि महाव्यवस्थापक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एस. टी. च्या परवानाधारक आस्थापनाधारकांच्या शुल्कामध्ये (भाडे) एस. टी. ची प्रवासी वाहतूक पुर्ववत १०० टक्के सुरु होईपर्यंत ७५ टक्के सवलत मिळावी, अशी मागणी एस. टी. कँन्टीन व स्टाँल परवानाधारक असोसिएशनने एका निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनाची प्रत परिवहन मंत्री तथा रा. प. महामंडळाचे अध्यक्ष अँड. अनिल परब यांना मध्यवर्ती कार्यालयात सादर करण्यात आली. तर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महाव्यवस्थापक माधव काळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करून दिली. या मागणीच्या संदर्भात श्री काळे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली, अशी माहिती असोशिएशनचे उपाध्यक्ष, जेष्ठ पत्रकार गणपत तथा भाई चव्हाण यांनी दिली.
श्री काळे यांच्याशी झालेल्या चर्चेवेळी असोसिएशनचे अध्यक्ष राम हरल, कार्यकारी अध्यक्ष विजय ऐताल, अंकुश इंगळे, दिनेश गुप्ता, पंकज अगरवाल, अण्णा शेट्ठी आदी उपस्थित होते.
असोसिएशनचे पदाधिकारी राज्यातील एस. टी. च्या बस स्थानकांतील परवानाधारक आस्थापना दुकानांचे परवाना शुल्का (भाडे) मध्ये एस. टी. च्या घटलेल्या प्रवासी वाहतुक फेर्यां, घटलेले कमालीचे प्रवासी आणि घटलेले वजा ७९ टक्के उत्पन्न याची सांगड घालून कमाल सवलत देण्यात यावी, यासाठी २५ जूनपासून सातत्याने प्रयत्न करीत आहेत. परिवहनमंत्री अँड. परब यांच्यासह महाव्यवस्थापक श्री काळे आणि संबंधित अधिकार्यांशी वारंवार प्रत्यक्ष भेटीगाठी चर्चा करीत आले आहेत.
दरम्यान कोरोनाची दुसरी लाट फेब्रुवारी पासून आल्याने या दुकानदारांचे पुन्हा एकदा आर्थिक कंबरडे मोडायला लागले आहे. त्यामुळे आधीच कर्जबाजारी असलेल्या परवानाधारकांना ही भरमसाठ भाडी भरणे दुरापास्त झाले आहे. परवानाधारक भरीव सवलतीच्या प्रतिक्षेत आहेत. कोरोनाची दुसरी लाट आल्याच्या पार्श्वभूमीवर असोसिएशनने ७ एप्रिल रोजी ७५ टक्के सवलतीचे निवेदन संबधितांना सादर केले आहे.
सद्या कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे अनेक जिल्यांमधिल एस. टी. ची वाहतूक बंद झाली आहे. वाहतूक सुरु असलेल्या जिल्हांमध्ये प्रवासी फेर्यांची संख्या कमालीची घटली आहे. शाळा-महाविद्यालये बंद असल्याने बस स्थानकांवर शुकशुकाट आहे.
त्यामुळे एस. टी. ची वाहतूक पुर्वीप्रमाणे १०० टक्के सुरू होईपर्यंत सप्टेंबर२०२० पासून राज्यातील एस. टी. च्या परवान शुल्कामध्ये सरसकट ७५ टक्के सवलत देण्यात यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.