*कोंकण एक्सप्रेस*
*पिकुळेचे सरपंच “आप्पा गवस” यांची जिल्हा परिषदेसाठी दावेदारी..*
*दोडामार्ग/ शुभम गवस*
दोडामार्ग तालुक्यातील माटणे जिल्हा परिषद मतदार संघात शिवसेनेतून (शिंदे गट) आता आणखी एक ताकदवान इच्छुक उभा राहिला आहे. पिकुळेचे सरपंच आप्पा गवस यांनी जिल्हा परिषदेसाठी आपली दावेदारी अधिकृतरीत्या दाखवून राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.
आप्पा गवस हे मागील आठ वर्षांपासून पिकुळे ग्रामपंचायतीत सक्रिय नेतृत्व करत आहेत. त्यांनी सलग पाच वर्षे उपसरपंच म्हणून तर मागील तीन वर्षांपासून सरपंच म्हणून प्रभावी कामगिरी केली आहे. गावातील विकासकामे, सामाजिक उपक्रम आणि लोकसंपर्क या सर्वच बाबतीत त्यांचा हातखंडा असल्याने त्यांचे नाव जनतेत लोकप्रिय आहे.
ग्रामविकासासोबतच आप्पा गवस यांचा समाजकार्याचा ठसा ठळक आहे. कोणत्याही वेळी जनतेच्या मदतीसाठी धावून जाणारे आणि सर्वांच्या अडचणींना प्रतिसाद देणारे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व असल्याने “आप्पा म्हणजे आपला माणूस” अशी प्रतिमा त्यांनी निर्माण केली आहे.
या दावेदारीला सरपंच सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अनिल शेटकर यांचे तसेच मतदार संघातील अनेक सरपंच आणि सदस्य यांचे समर्थन मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे गवस यांची उमेदवारी आता शिवसेनेतून (शिंदे गट) अधिक मजबूत होताना दिसत आहे. राजकीय जाणकारांच्या मते, “माटणे जी. प. मतदार संघात स्थानिक नेतृत्वावर जनतेचा विश्वास आहे आणि गवस हे या अपेक्षांना न्याय देऊ शकतील, अशी धारणा वाढत आहे.”
युवा वर्ग, स्थानिक नेतृत्व आणि संघटनांचा पाठींबा मिळाल्यास आप्पा गवस यांची दावेदारी शिवसेनेत निर्णायक ठरू शकते.

