तुलसी विवाहारंभ विचार

तुलसी विवाहारंभ विचार

*कोंकण एक्सप्रेस*

*तुलसी विवाहारंभ विचार*

* कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*

२ नोव्हेंबर,२०२५ पासून पंचांगांमधून तुलसी विवाहारंभ दिलेला आहे. सर्वसाधारणतः कार्तिक शुक्ल प्रबोधिनी एकादशीला श्रीविष्णूला शयनावस्थेतून जागृत केले जाते व द्वादशीला प्रदोषकाळी तुलसी विवाह प्रारंभ होत असतो.

यावर्षी १ नोव्हेंबर, २०२५ रोजी मुंबई वेळेनुसार सकाळी ०९-११ पासून २ नोव्हेंबर, २०२५ रोजी सकाळी ७-३१ पर्यंत एकादशी आहे. यादरम्यान विष्णु प्रबोधन असते. त्यानंतर कार्तिक शुक्ल द्वादशीच्या प्रदोषकाळी तुलसी विवाह आरंभ होत असतो त्यानुसार पंचांगांतून २ नोव्हेंबर, २०२५ पासून तुलसी विवाहारंभ दिलेला आहे. ही द्वादशी २ नोव्हेंबर,२०२५ रोजी सूर्योदयानंतर सकाळी ७-३१ पासून ३ नोव्हेंबर,२०२५ रोजी सूर्योदयापूर्वी ५-०७ पर्यंत आहे. ही तिथी दोन्ही दिवस सूर्योदयाला मिळत नसल्यामुळे क्षय तिथी आहे. क्षय तिथी ही शुभ किंवा मांगलिक कार्यासाठी अशुभ मानली गेली असून या तिथीवर शुभ कार्य किंवा मांगलिक कार्य करू नये असे शास्त्रसंकेत आहेत. म्हणून तुलसीविवाह हे एक अत्यंत मांगलिक कार्य असल्याने ते या तिथीवर टाळणे योग्य होईल. अर्थात क्षय तिथी असल्यामुळे रविवारी २ नोव्हेंबर, २०२५ रोजी तुलसी विवाहाचे कार्य टाळून ते पुढे ३ नोव्हेंबर, २०२५ पासून ५ नोव्हेंबर २०२५च्या पौर्णिमेपर्यंत प्रदोषकाळी शुभकाली केल्यास बरे

या विचाराच्या बाबतीत काहींची अशीही मतप्रणाली असू शकते की, तुळशीच्या विवाहाच्या संबंधी द्वादशीला पूर्वापार महत्व दिले गेले आहे त्यामुळे तसेच विष्णू आणि तुळस या दोन देवतांचा विवाह लावण्याचा असल्यामुळे शुभ-अशुभत्वाचा विचार कशाला करायला हवा, क्षय तिथीचे अशुभत्व कशाला मानावे? एकंदरीत वेदांनी शुभ आणि अशुभत्व यांचे कालसापेक्ष महत्त्व प्रतिपादन केलेले आहे. वेदांनी सांगितलेली कालसापेक्षता ही देवांना वेगळी आणि मानवाला वेगळी अशी मुळीच नाहीय. विवाहासारख्या मांगलिक कार्यासाठी शुभ मुहूर्त प्राधान्याने सांगितलेले आहेत. या शुभमुहूर्तात तिथी, वार, नक्षत्र, करण आणि योग ही काळाची पाच अंगे (पंचांग) शुभ असण्याच्या आवश्यकतेवर भर दिलेला आहे आणि शुभमुहूर्त सावधान! यातून या पंचांगांच्या शुभत्वतेचे महत्व प्रबोधीत केले गेले आहे. अर्थात विवाहासारख्या मांगलिक कार्यांमध्ये शुभ आणि अशुभ यांचा विचार करून क्षय तिथी टाळण्यास सुचविले आहे. माणसाच्या कार्यासाठी आपण जर शुभत्वाचा विचार करीत असलो तर देवांच्या कार्यासाठी शुभत्वाचा विचार करायला नको का? वेगळा विचार कशासाठी? वेदांमध्ये देवांना शुभाशुभत्त्वासाठी तेच नियम सांगितलेले आहेत जे माणसांसाठी शास्त्रांनी स्वीकारून पुढे आचरणासाठी प्रबोधित केले आहेत. त्यामुळे क्षय असलेली द्वादशी टाळून पुढे त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यत तुळसी विवाह करता येण्यासारखे आहे याचा अवश्य विचार व्हावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!