*कोकण Express*
*जिल्ह्यात येण्यासाठी आरटीपीसीआर गरजेचे नाही…*
*सिंधुदुर्गनगरी दि.१०-:*
सिंधूदुर्ग जिल्ह्यातील कोरोना बाधितांची सरासरी सप्टेंबर, ऑक्टोबर २०२० या दोन महिन्या पेक्षा जास्त आहे. अर्थात त्यावेळी दिवसाला ६०० कोरोना चाचणी करण्यात येत होत्या. आता दिवसाला बाराशे चाचणी करण्यात येत आहेत. तसेच जिल्ह्यात दाखल होणाऱ्या नागरिकांना आरटीपीसीआर सक्तीची करण्यात आलेली नाही. परंतु आरटीपीसीआर करून येण्याची विनंती केली आहे. ती केलेली नसल्यास प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालय येथे ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथे मोफत सुविधा आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यानी दिली. डॉ पाटील यानी शनिवारी दुपारी आपल्या दालनात पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी डॉ हर्षल जाधव, डॉ शाम पाटील, माहिती अधिकारी हेमंत चव्हाण उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना डॉ श्रीपाद पाटील यानी कोरोना रोखण्यासाठी सध्या तीन सूत्री पर्याय महत्वाचा आहे. मास्क वापरणे. गर्दीत जाणे टाळणे आणि सॅनिटायझर करणे, हाच उत्तम पर्याय आहे. याचा वापर जिल्ह्यातील नागरिकांनी करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.