*कोंकण एक्सप्रेस*
*सुमारे २५ वर्षांनी मुंबईत नाईक मोचेमाडकर दशावतारी मंडळाचा कलाविष्कार!*
*वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव)*
मुंबई येथे सुरू असलेल्या मालवणी जत्रौत्सवात वेंगुर्ला तालुक्यातील मोचेमाड येथील नाईक मोचेमाडकर पारंपरिक दशावतारी लोकनाट्य मंडळाने उत्कृष्ट पौराणिक नाटक सादर करीत नाट्यरसिकांची वाहवा मिळविली. सुमारे २५ वर्षांनी नाईक मोचेमाडकर या मंडळाची कला पाहण्याचा योग मुंबईकरांना मिळाला.
मोचेमाड येथील नाईक मोचेमाडकर पारंपरिक दशावतारी लोकनाट्य मंडळ हे दशावतारी परंपरेचा दिवा अखंड तेवत ठेवत आहेत. या मंडळाची परंपरा आठशे वर्षांची आणि घराण्याचा इतिहास बारा पिढ्यांचा आहे. या कलेचा वारसा रक्तात आणि श्रद्धा श्वासात घेऊन चाललेले संचालक तुषार सोनू नाईक मोचेमाडकर हे या घराण्याचे निष्ठावंत वारसदार आहेत. पदवीधर असूनही त्यांनी दशावतारी लोककलेचा अभ्यास आपल्या आयुष्याचं ध्येय मानले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली नाईक मोचेमाडकर मंडळाने आजपर्यंत देशभरातील अनेक मंचांवर नाट्यप्रयोग सादर करू रसिकांची उत्तुंग दाद मिळवली आहे. १९९६ ते २०२० या कालखंडात या मंडळाने नाट्यस्पर्धांमध्ये सलग दहा वर्षे प्रथम क्रमांक मिळवला आहे.
दरम्यान, नुकतेच मुंबईच्या गजबजलेल्या वातावरणात जेव्हा मालवणी जत्रोत्सव २०२५ या सांस्कृतिक सोहळ्याची रंगत चढत होती, तेव्हा त्याच मंचावर नाईक मोचेमाडकर मंडळाने आपला पारंपरिक दशावतारी नाट्यप्रयोग सादर करीत रसिकांना खिळवून ठेवले. मंडळाचे राजपार्ट तथा दशावतारी क्षेत्रात नारदाची भूमिका साकारणारे प्रसिद्ध दशावतारी कलाकार विठ्ठल गांवकर यांचे सुपुत्र सागर गांवकर यांच्या अभिनयात राजेशाहीची झळाळी आणि भावनांची खोली जाणवत होती. त्यांच्या राजपात्रातली अंगभूत ताकद, देहबोली आणि आवाजाचा गडगडाट पाहून रसिकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. प्रत्येक कलाकाराने आपापल्या भूमिकेत प्राण ओतला. सात्विक स्त्रीची भूमिका साकारणारे संतोष गावडे यांचा अभिनय इतका भावपूर्ण होता की प्रेक्षकांच्या नजरा काही क्षणांसाठी त्यांच्या मुखाभिनयावर स्थिरावल्या. त्यांचा भावार्थी चेहरा आणि ओघवत्या संवादफेकीतून स्त्रीपात्रातील कोमलता जिवंत झाली. बंड्या परब यांनी साकारलेली नारदाची भूमिका ही नाट्यप्रयोगाची अनपेक्षित शोभा ठरली. अभिषेक मयेकर या तरूण आणि उल्हास नाईक या जेष्ठ कलाकारांनी आपल्या अभिनयाने नाटकात जोश आणि स्फूर्ती आणली. त्यांच्या संवादांमधली ऊर्जा, त्यांच्या हालचालींमधला आत्मविश्वास आणि त्यांच्या नजरेतली जिवंत अभिव्यक्ती यामुळे रंगमंच प्रखरतेने झळकला. राक्षसाची भूमिका साकारणारे निलेश नाईक आणि त्यांचा सहकलाकार प्रशांत (बबलू) गावडे यांनीही त्यांच्या दमदार सादरीकरणाने प्रक्षकांची मनं जिंकली. रंगमंचावरून ओघळणारा त्यांचा आवाज जणू काळाच्या गाभा-यात घुमत राहिला.

या नाट्यप्रयोगाचा आत्मा म्हणजे त्याचं संगीत. संगीत हे नाट्यकलेचं निःशब्द हृदय असतं, आणि या हृदयाचे ठोके दिले हार्मोनियम वादक कु. चिन्मय सावंत यांनी. त्यांच्या सुरांनी सभागृहात जणू गंध भरला. त्यांच्या गोड गळ्याने आणि मंत्रमुग्ध करणा-या संगिताने रसिक अक्षरशः डोलत होते. प्रेक्षकांच्या प्रतिसादाने भारावून ते स्वतः भावूक झाले. यापुढेही उत्कृष्ट संगीताने आपली सेवा करीन असे सांगितले.
या नाट्यप्रयोगात तालाची सजीव साथ दिली पखवाज वादक घनश्याम पालव यांनी. त्यांच्या पखवाजाच्या ठेक्यांनी रंगमंचाच्या प्रत्येक कोपयात नवा श्वास निर्माण केला. मुखडे, दोहरे, चक्रधार, सरपट अशा विविध ठेक्यांच्या संगतीत त्यांनी संगीताला नृत्याची चाल दिली. या संगीताला रंग देणारा अदृश्य, पण अत्यंत महत्त्वाचा घटक होता तालरक्षक महेश नाईक. त्यांनी अचूक वेळ साधून संगीताची बांधणी केली.
ज्येष्ठ तबलावादक महादेव दळवी हे या मंडळाचे आत्मस्वर. त्यांच्या तबल्याच्या ठेक्यांमध्ये वर्षानुवर्षांची साधना आणि प्रामाणिकतेचा गंध आहे. नाट्यप्रयोगादरम्यान जेव्हा त्यांच्या बोटांखाली ठेका जन्म घेत होता, तेव्हा तो ठेका फक्त तालाचा नव्हता तो भक्तीचा होता, तो परंपरेचा होता. कार्यक्रमाच्या अखेरीस महादेव दळवी तसेच मंडळाचे संचालक तुषार नाईक यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
गेल्या पंचवीस वर्षापूर्वी ज्या ताकदीने नाईक मोचेमाडकर कंपनीने नाटक सादर केले होते, तिच ताकद, तोच उत्साह, तिच परंपरेची लय आजही दिसून आल्याचे एका वयोवृद्ध रसिकाने बोलताना सांगितले.
सुमारे २५ वर्षांनी आमच्या कलाकारांनी ज्या तन्मयतेने काम केले, तिच आमची खरी कमाई आहे. दशावतार ही आमच्या घराण्याची ओळख आहे; ती पुढच्या पिढीकडे पोहोचवणं हे आमचं कर्तव्य आहे. रसिकांची दाद हा आमच्यासाठी सर्वोच्च पुरस्कार असल्याचे मंडळाचे संचालक तुषार नाईक यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले.

