*कोकण Express*
*खारेपाटण येथून कोरोना रुग्ण पळाला…*
*आरोग्य यंत्रणेची धावपळ : घरमालकावर गुन्हा…*
*कणकवली ःःप्रतिनिधी*
कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला एक परप्रांतीय रुग्ण खारेपाटण सोडून पळाल्याने आरोग्य यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली आहे. या प्रकरणी तो ज्या घरात भाड्याने राहत होता त्याच्या गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
मूळ राजस्थान मधील असलेला किसनलाल मोतीलाल गायरी हा भेळ विक्रेता खारेपाटणमध्ये वास्तव्यास होता. खारेपाटण कर्लेवाडीत आपल्या मेहुण्यासोबत भाड्याच्या घरात राहून तो खारेपाटण बाजारपेठेत जिल्हा बँकेच्या खाली भेळविक्री करत असे. त्याची स्वॅब टेस्ट ७ एप्रिल रोजी खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात घेण्यात आली होती. स्वॅब टेस्ट केल्यानंतर त्या भेळवाल्याला घराबाहेर न पडण्याचा सल्ला आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यानी दिला होता. त्याचा टेस्ट रिपोर्ट ९ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे आरोग्य कर्मचारी त्याला शोधत होते. किसनलाल राहत असलेल्या घरी गेल्यानंतर त्याने स्वॅब टेस्ट केल्यादिवशीच ट्रेनने राजस्थान ला पोबारा केल्याचे समजले आणि आरोग्य यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली. वैद्यकीय अधिकारी प्रिया वडाम यांनी याबाबत खारेपाटण आउटटपोस्ट ला तक्रार दिल्यानुसार किसनलाल गायरी व घरमालक मंगळाराम देवासी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.