*कोंकण एक्सप्रेस*
*साळशी येथे बीएसएनएल टॉवर बंद : जनसंपर्क ठप्प*
*शिरगाव : संतोष साळसकर*
देवगड तालुक्यातील साळशी येथील बीएसएनएल मोबाईल टॉवर गेल्या पाच ते सहा दिवसांपासून बंद असल्यामुळे गावातील जनसंपर्क तुटला आहे. यामुळे मोबाईलधारकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
साळशी येथे बीएसएनएल कंपनीचा मोबाईल टॉवर असून तोच संपर्काचे एकमेव साधन आहे. मात्र, टॉवर बंद असल्यामुळे ऑनलाईन व्यवहार, नातेवाईकांशी संपर्क साधणे तसेच विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यास या सर्व सेवांवर परिणाम झाला आहे. डाटा पॅक खरेदी करूनही इंटरनेट सेवा न मिळाल्याने मोबाईलधारकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
मोबाईलवर कॉल न लागणे, कॉल कट होणे, इंटरनेटचा वेग मंद असणे तसेच आवश्यक कागदपत्रे डाउनलोड करण्यात अडचणी येत आहेत. अशा समस्या आता नेहमीच्याच झाल्या आहेत. यापूर्वीही हा टॉवर वारंवार बंद पडत असल्याने ग्रामस्थात असंतोष पसरला आहे.तसेच टॉवरच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडी वाढलेली आहे.
तरी हा बंद असलेला मोबाईल टॉवर तातडीने सुरू करून होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी मोबाईलधारकांकडून करण्यात आली आहे.

