*कोंकण एक्सप्रेस*
*पर्यावरणपूरक आकाश कंदील स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद*
*श्रुती तळेकर, मनस्वी मेस्त्री, दिपाली मेस्त्री प्रथम : दिविजा वृद्धाश्रम, सुनील तळेकर ट्रस्ट व वाचनालय आणि प्रज्ञांगणचे आयोजन : स्पर्धेचे पाचवे वर्ष*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले.*
मुलांमध्ये सर्जनशीलता, पर्यावरणपूरकता, संदेशप्रधानता आणि सामाजिक संवेदनशीलता वाढविण्यासाठी गेली पाच वर्षे आयोजित करत असलेली ही पर्यावरण पूरक आकाश कंदील स्पर्धा म्हणजे मुलांना घडविण्यासाठी महत्वाचे माध्यम आहे. या स्पर्धेला यावर्षी मिळालेला प्रतिसाद या स्पर्धेची उंची वाढविणारी आहे, असे प्रतिपादन स्पर्धेचे परीक्षक रेश्मा फाटक यांनी व्यक्त केले. तळेरे येथे आयोजित केलेल्या पर्यावरण पूरक आकाश कंदील स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात त्या बोलत होते.
या कार्यक्रमाची सुरुवात वाचनालयाचे अध्यक्ष राजू वळंजू यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष राजू वळंजू, स्पर्धेचे परीक्षक उदय दुधवडकर, ऋतू महाडिक, रेश्मा फाटक, सुनील चॅरिटेबल ट्रस्टचे निकेत पावसकर, वाचनालयाचे सचिव मिनेश तळेकर, प्रज्ञांगण परिवाराच्या प्रमुख श्रावणी मदभावे, सतीश मदभावे, प्रा. हेमंत महाडिक आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत कणकवली, देवगड आणि वैभववाडी तालुक्यातील एकूण 55 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेसाठी स्पर्धकांनी तयार केलेले आकाश कंदील पर्यावरणपूरक आणि सामाजिक संदेश देणारे होते. यावेळी व्यसनमुक्त समाज, स्वच्छ भारत, पाणी वाचवा, निसर्गाचे रक्षण, बालशिक्षण अशा विषयांवर प्रबोधन करणारे आकाश कंदील तयार केले होते. हे सर्व आकाश कंदील असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमाला देण्यात आले.
ही स्पर्धा एकूण तीन गटात घेण्यात आली. त्याचा निकाल पुढीलप्रमाणे :
लहान गट (1 ली ते 4 थी) – (अनुक्रमे प्रथम तीन आणि उत्तेजनार्थ) श्रुती तळेकर, दुर्वा मेस्त्री, अक्षरा पावसकर, सिद्धांत जाधव, ऋषभ कानकेकर
मोठा गट (5 वी ते 10 वी) – (अनुक्रमे प्रथम तीन) मनस्वी मेस्त्री, संस्कार कुलकर्णी, प्रसन्न सारंगे तर उत्तेजनार्थ आयुषी वायंगणकर, आकांक्षा आडीवरेकर, पूर्वा केळुस्कर, आराध्या तळेकर
खुला गट – दिपाली मेस्त्री, शिवानी राणे, शिवानी जाधव
या विजेत्या स्पर्धकांना प्रथम तिघांना रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तर उत्तेजनार्थ विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वारगाव नं. 1 मधील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त या स्पर्धेत सहभाग घेतला त्याबद्दल सर्व सहभागी स्पर्धक, मार्गदर्शक शिक्षक आणि पालक यांना विशेष प्रोत्साहनपर सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी राजू वळंजू, उदय दुधवडकर, ऋतू महाडिक, श्रावणी मदभावे यांनी मनोगत व्यक्त केले. तर स्पर्धकांमधून नाधवडे येथील शिक्षक श्री. कासले यांनी आपले मत व्यक्त केले. यावेळी प्रास्ताविक सतीश मदभावे यांनी, सूत्रसंचालन निकेत पावसकर तर आभार सतीश मदभावे यांनी मानले.

