*कोकण Express*
*मालवण शहरासह ग्रामीण भागातील स्थिती*
*मालवण ः प्रतिनिधी*
वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे राज्यात लागू केलेल्या विकेंड लॉकडाऊनला मालवण वासीयांनी उत्तम प्रतिसाद दिला असून नागरिकांनी घराबाहेर न पडणे पसंत केल्याने मालवण शहर व तालुक्यात सर्वत्र शुकशुकाट दिसत आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. सार्वजनिक वाहतूक देखील बंद आहे. शहरात ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी व होमगार्ड तैनात करण्यात आले आहे. कोरोनाच्या प्रकोपामुळे राज्य शासनाने कडक निर्बंध लादतानाच शनिवार व रविवार कठोर लॉकडाऊन घोषित केले होते. त्या पार्श्वभूमीवर काल शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून दोन दिवसीय विकेंड लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. हे लॉकडाऊन सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत राहणार आहे. काल रात्री आठ वाजल्यापासूनच मालवण मधील वर्दळ कमी होऊन दुकाने बंद ठेवण्यात आली होती. आज लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशीही सकाळपासूनच मालवणात सर्वत्र शुकशुकाट दिसत होता. मालवणची बाजारपेठ बंद होती. मेडिकल, किराणा माल व काही अत्यावश्यक सेवेतील आस्थापने, शासकीय कार्यालये वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. मासे मार्केट बंद ठेवण्यात आले होते. तर भाजी विक्रेत्यांची दुकाने सुरू होती. मालवणातील एसटी बस, रिक्षा वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. नागरिकांनी या लॉकडाऊनला उत्तम प्रतिसाद दिला असून त्यांनी घरी राहणे पसंत केले आहे. यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट असून फक्त अत्यावश्यक कारणांसाठी काही नागरिक बाहेर पडत होते. तर काही विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना व वाहनचालकांना पोलीस कर्मचारी व नगरपालिका कर्मचारी यांच्याकडून अडवून विचारणा केली जात होती. तर काही मोजक्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. फिरणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी भरड नाका व देऊळवाडा नाका येथे वाहतूक पोलीस, पोलीस कर्मचारी व नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे पथक तैनात करण्यात आले होते. शहरात मोक्याच्या ठिकाणी पोलीस कर्मचारी व होमगार्ड बंदोबस्तासाठी ठेवण्यात आले होते.