*कोंकण एक्सप्रेस*
*देवगडच्या प्रा. विशाखा जयश्री साटम यांना नमस्कार फाउंडेशन, दिल्ली यांच्याकडून ‘भारत गौरव सन्मान २०२५’ उत्कृष्ठ प्राध्यापिका पुरस्काराने गौरव*
*शिरगांव : संतोष साळसकर*
देवगड तालुक्यातील शिरगाव बाजारपेठ येथील स्काय एज्युकेशन कोचिंग क्लासेसच्या संस्थापिका व प्राध्यापिका विशाखा प्रभाकर साटम यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय आणि आदर्श कार्याबद्दल नमस्कार फाउंडेशन, नवी दिल्ली तर्फे ‘भारत गौरव सन्मान – २०२५ उत्कृष्ट आदर्श प्राध्यापिका’ हा प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सन्मान संस्थेचे संस्थापक दीपक सारस्वत सर (दिल्ली) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
प्रा. साटम गेल्या नऊ वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून, त्या आपल्या स्काय एज्युकेशन कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून अनेक मध्यमवर्गीय व गरजू विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण, मूल्याधारित आणि परवडणारे शिक्षण देत आहेत. त्यांच्या अथक परिश्रम आणि मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थी आज समाजात स्वतःच्या पायावर उभे राहून यशस्वी झाले आहेत.
आजपर्यंत प्रा. साटम यांना विविध महाविद्यालये, विद्यापीठे, संस्था आणि फाउंडेशनकडून साडेपाचशेहून अधिक प्रशस्तीपत्रे, सन्मानचिन्हे आणि गौरवपत्रे प्राप्त झाली आहेत. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या कार्याची सातत्याने दखल घेत देशभरातील संस्थांकडून त्यांचा सतत सन्मान करण्यात आला आहे.
या राष्ट्रीय गौरवाबद्दल प्रा. विशाखा साटम यांचे सर्व स्तरांवरून हार्दिक अभिनंदन होत असून, त्यांचा हा सन्मान देवगड तालुक्यासह संपूर्ण कोकण प्रदेशासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.

