*कोंकण एक्सप्रेस*
*मोफतचे होत आहे अति नि शेतकर्यांची होत आहे माती – विलास गांगण*
*कणकवली:- प्रतिनिधि*
देशाचे प्रधानसेवक नरेंद्र मोदीच्या म्हणण्यानुसार गेल्या ११ वर्षांच्या कालावधीत देशातील २५ कोटी पेक्षा अधिक जनता दारिद्रय रेषेच्या वर आली आहे. पण दारिद्र्य रेषेखालील कुटुंबियांची यादी मात्र घटलेली दिसत नाही. धान्य मुबलक प्रमाणात मोफत देण्याच्या योजनेमुळे शेती-बागायती फुलविणाऱ्या बळीराजाला मजूरच मिळत नसल्याने भविष्यात त्यांच्याच कुटुंबावर दारिद्र्य रेषेखालील कुटुंब होण्याची टांगती तलवार आहे. केंद्र शासनाच्या या योजनेमुळे मोफतचे होत आहे अति नि शेतकर्यांची होत आहे माती, अशी परिस्थिती देशभरात निर्माण झाली आहे, अशी रोखठोक प्रतिक्रिया कोकण विकास आघाडीचे उपाध्यक्ष, राजापूर रायपाटणचे माजी सरपंच विलास गांगण यांनी दादर – मुंबई येथे व्यक्त केली.
कोकण विकास आघाडीचा ४७ वा वर्धापन दिन दादर येथील शारदाश्रम विद्यालयात नुकताच साजरा करण्यात आला. संस्थापक अध्यक्ष मोहन केळुसकर हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे विलास गांगण यांच्या अध्यक्षतेखाली हा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. त्यावेळी शेतकरी असलेले गांगण यांनी सार्वत्रिक मनातील ही खदखद व्यक्त केली. व्यासपिठावर सरचिटणीस एकनाथ दळवी, मुंबईचे माजी नगरसेवक विजयकुमार दळवी, प्रकाश तावडे, मनोहर डोंगरे, गणपत तथा भाई चव्हाण हे होते.
यावेळी कोकणातील उपस्थित रमाकांत जाधव, चंद्रकांत आंब्रे, आनंद साळवी, अंकुश काते, श्रीपाद केसरकर, भालचंद्र तारी, नरेंद्र म्हात्रे, गणपत परब, रमेश आंग्रे, पुनाजी गुरव आदींनी विलास गांगण यांच्य भूमिकेला समर्थन करताना आपापल्या भागातील प्रामाणिकपणे शेतात राब राब राबणार्या शेतकर्यांना शासनाच्या अशा मोफत योजनांमुळे शेती बागायती, पाळीव जनावरे, कुक्कुटपालन आदींवर तुळशीपत्र ठेवावे लागत आहे. राजकीय पक्षांच्या दावणीला पेड कार्यकर्ते जुपल्यामुळे केडर बेस संस्थांना सक्रिय कार्यकर्यांची वाणवा जाणवत आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
चौकट
अबब… ४७ वर्षांची अखंड वाटचाल !
कोविआचा ४७ वा वर्धापनदिन हे वाचून प्रथमच उपस्थित राहिलेले विविध क्षेत्रांत देश विदेश पातळीवर कार्यरत असलेले सर्वश्री डॉ. प्रशांत सीता रामचंद्र सावंत, ॲड. डॉ. नीलेश वैजयंती पावसकर, गणपत संतोष परब यांनी कोविआच्या आजवरच्या कार्याच्या वाटचालीचे कौतुक करुन आम्ही त्रिमुर्ती भविष्यात कोविआच्या पालखीचे भोई होऊन उज्ज्वल भविष्यासाठी प्रामाणिकपणे क्रियाशील राहू, असे ठामपणे सांगितले.
____+__

