*कोंकण एक्सप्रेस*
*उमेदतर्फे महिलांना विविध योजना आणि रोजगाराचे मार्गदर्शन*
*वेंगुर्ला प्रतिनिधी*
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापन झालेल्या भरारी महिला प्रभाग संघ, आडेलीची वार्षिक सर्वसाधारण सभा ७ ऑक्टोबर रोजी वेतोरे येथील साई योगेश्वरी मंगल कार्यालयात संपन्न झाली. या सभेला सुमारे २०० महिला उपस्थित होत्या.
आडेली प्रभागात २५० समुह असून त्यात २ हजार ६०० महिला कार्यरत आहेत. या महिलांना रोजगारासाठी शासनाच्या विविध योजनांमधून कर्जे वाटप केली जातात. तसेच आता उमेदचा ऑनलाईन मार्ट अॅप तयार केला असून यामार्फत बिगर शेतीवर आधारित व्यवसायातून पदार्थ तयार करून त्याची विक्री होत असल्याची माहिती तालुका अभियान व्यवस्थापक अमोल कावेल यांनी दिली. तसेच विविध योजनांबाबत आणि रोजगाराबाबत महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपिठावर अध्यक्ष वैभवी पोतदार, सचिव श्वेता चेंदवणकर, कोषाध्यक्ष सेजल जाधव आदी उपस्थित होत्या. या सभेदरम्यान, वैद्यकीय अधिकारी व आरोग्यसेवकांतर्फे उपस्थित महिलांची रक्तदाब, मधुमेह आणि हिमोग्लोबिन आदींची तपासणी करण्यात आली. या सभेला सखी (वेतोरे), हिरकणी (खानोली), प्रेरणा (मठ), स्वयंभू (वायंगणी), संगम (दाभोली), स्त्रीशक्ती (पालकरवाडी), जिजाऊ (आडेली), सोमेश्वर (आडेली) या ग्रामसंघाच्या मिळून २०० महिला उपस्थित होत्या. तसेच सभा यशस्वी करण्यासाठी प्रभाग समन्वयक, प्रभागसंघ व्यवस्थापक, आयसीआरपी, सीटीसी, बीडीएसपी, प्रभागसंघ लिपिका, ग्रामसंघ लिपिका, ब्लॉक अॅकर, कृषीसखी, पशूसखी, उद्योगसखी, एससीआरपी आदींचे सहकार्य लाभले.

