ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेचे उल्लेखनीय कार्य

ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेचे उल्लेखनीय कार्य

*कोंकण एक्सप्रेस*

*ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेचे उल्लेखनीय कार्य*

*पद्मश्री पुरस्कार विजेते परशुराम गंगावणे यांचे गौरवोद्गार*

*कासार्डे प्रतिनिधी; संजय भोसले.*

ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ही संघटना जिल्ह्यातील अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच जिल्ह्यातील अनेक समस्या व प्रश्नांवरती आवाज उठवून आणि सातत्याने पाठपुरावा करीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगल्याप्रकारे कार्य करीत आहे. या संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्ह्यात चांगल्याप्रकारे काम सुरू आहे. सर्वांना सोबत घेऊन निस्वार्थीपणे व प्रामाणिकपणे सर्वसामान्याचे प्रश्न मार्गी लागले की संघटना अधिक नावारुपाला यायला लागते. यापुढेही चांगली कामे सातत्याने, अविरतपणे करत रहावीत आणि संघटना अधिक नावारुपाला आणावी असे गौरवोद्गार पद्मश्री पुरस्कार विजेते परशुराम गंगावणे यांनी केले.

ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन, सिंधुदुर्ग व सर्व तालुका कार्यकारिणी पदाधिकारी यांची संयुक्त सर्वसाधारण सभा आणि जिल्हा व तालुका पदाधिकारी यांची ओळखपत्र वितरण समारंभ नुकताच कुडाळ-पिंगुळी येथील ठाकर समाज कला आंगण येथे पार पडला. संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी व्यासपीठावरती प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री परशुराम गंगावणे, ‘कात्यायनी’ पुस्तकाच्या लेखिका सौ.कावेरी कासरलकर उपस्थित होत्या तसेच संघटनेचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक प्रणय बांदिवडेकर, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सुधीर धुरी आदी उपस्थित होते. त्याचबरोबर जिल्हा व सर्व तालुका पातळीवरील पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना परशुराम गंगावणे पुढे म्हणाले की, एकजूटीने काम करुन संघटनेचे कार्य उभे करुयात. ठाकर आदिवासी कला आंगण केंद्राच्या माध्यमातून ही कला सर्वदूर पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. मी एक स्वप्न बघितले आणि ते सत्यात उतरवले यांचा मला अभिमान वाटतो. आयुष्यभर लोककला जिवंत ठेवण्यासाठी सामाजिक चळवळ उभी केली. ते कार्य सातत्याने करीत राहिलो. त्यामुळेच मला पद्मश्री पुरस्कार मिळाला हे माझे कौतुक नाही तर जिल्ह्याचे कौतुक आहे. मी तुम्हाला देत गेलो तुम्ही ते घेत चला असा संदेश त्यांनी याप्रसंगी दिला.

यावेळी प्रमुख वक्त्या कात्यायनी पुस्तकाच्या लेखिका सौ.कावेरी कासरलकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, मानवाधिकार आणि स्त्रियांचे अधिकार या दोन्ही गोष्टी समाजामध्ये एकमेकांशी सहाय्यभूत ठरणाऱ्या अशाच आहेत. माणसांची ओळख नावापेक्षा कर्तृत्ववाने होते. मानवी हक्काचे संरक्षण करणे, स्वतःची काळजी स्वतः कशी घ्यायची याविषयी प्रत्येकाने सजक आणि सतर्क राहिले पाहिजे. आत्ताची पिढी सोशल मीडिया व रिल्समध्ये अडकलेली आहे. परंतु महिलांनी स्वतःचे संरक्षण स्वतः कसं करायचं ते मी माझ्या “कात्यायनी” या पुस्तकात दिले आहे. माझे कार्य देखील मानवी हक्क कार्याला जोडणारे आहे. आता यानंतर रेपमुक्त भारत आणि रेप मुक्त समाज हे पुस्तक लवकरच वाचकांसाठी येणार आहे. माणूस म्हणून आपण काय आहोत याची जाणीव करून यात करून दिली आहे. समोरच्याला बदलण्यापेक्षा आपण स्वतः बदला असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते जिल्हा पदाधिकारी व सर्व तालुका पदाधिकारी यांची ओळखपत्रे वितरीत करण्यात आली. तसेच पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अनेक प्रश्नांवरती विचारविनिमय करण्यात आला. त्याचबरोबर आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाबद्दल चर्चा करण्यात आली.

सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत संतोष नाईक यांनी पुष्प गुच्छ देऊन केले. तसेच प्रमुख पाहुण्यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना संतोष नाईक यांनी संघटनेच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. सूत्रसंचालन संघटनेचे उपाध्यक्ष संजय शेळके यांनी केले. तर शेवटी आभार जिल्हाध्यक्ष सुधीर धुरी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!