*कोकण Express*
*संजय देसाई यांनी केलेले आरोप सिद्ध करून दाखवावे…*
*माजी जिल्हा परिषद अध्यक्ष समिधा नाईक*
*सिंधुदुर्गनगरी ता.०९:*
जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई यानी केलेले आरोप सिद्ध करून दाखवावे.त्यांनी माहिती अधिकारात माहिती मागवावी.त्यासाठी माझे त्यांना पूर्ण सहकार्य राहणार आहे.माझा कालावधी कोरोनामुळे पूर्वीचे दायित्व वितरण करण्यात गेला.नवीन कामे मला सोडता आली नाहीत,अशी माहिती माजी जिल्हा परिषद अध्यक्ष समिधा नाईक यानी पत्रकार परिषदेत दिली.
संजय देसाई यानी गुरुवारी वित्त समिती सभेत संजना सावंत यांचा कालावधी वगळता आपल्याला एकही रूपयांचा निधी मिळालेला नाही, असा गंभीर आरोप करीत चुकीच्या पद्धतीने निधी वाटप करण्यात आलेले आहे. कामे वीकली जातात. याबाबत आपण माहिती अधिकारात माहिती मागणार असल्याचा इशारा दिला होता. यामुळे आज माजी अध्यक्षा सौ नाईक यानी पत्रकार परिषद घेत आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांच्या समवेत माजी जिल्हा परिषद सदस्य समीर नाईक उपस्थित होते.
पुढे बोलताना सौ नाईक यानी, जानेवारी २०२० मध्ये आपण अध्यक्ष पदी बसले. दोन महिन्यात कोरोना सुरु झाला. शासनाने तात्काळ नवीन मंजूरी बंद केली. तसेच बजेट ५० टक्के करीत केवळ दायित्व देण्याचे अधिकार ठेवले. मी कोणालाही स्वनिधी दिला नाही. त्यामुळे संजय देसाई यानी याबाबत पूर्ण माहिती घ्यावी. त्यासाठी माझा त्यांना पूर्ण पाठीबा राहिल. मात्र, त्यांनी केलेले आरोप सिद्ध करून दाखवावे, असेही यावेळी सौ नाईक यानी सांगितले.
आपण आज देसाई यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गेल्या चार वर्षात केवळ ६० हजार रुपये स्वनिधी मिळाला, असे सांगितले. मग एवढे दिवस देसाई गप्प का होते ? आताच त्यांनी आवाज का उठविला ? असा प्रश्न करीत आपल्याला अध्यक्ष काळात लोकांची कामे करता आली नाहीत, याबाबत मला खंत आहे. कोणालाही न्याय देवू शकलेली नाही, असे त्या म्हणाल्या.