*कोंकण एक्सप्रेस*
*सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरकार घोषित सैराट – कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा, एसआयटी चौकशीची धुरींची मागणी*
*दोडामार्ग ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून गेल्या वर्षभरापासून हिंदू-मुस्लिम नावाखाली सैराट सुरू आहे. गोमांसाच्या नावाखाली वाहन चालकांना मारहाण, गाड्या फोडणे, जाळणे यांसारखे प्रकार सातत्याने घडत आहेत. तरीसुद्धा एकाही प्रकरणाची चौकशी आजपर्यंत पूर्ण झालेली नाही. सरकारने जणू या गुन्हेगारांना मोकळे रान दिले असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी करत तीव्र संताप व्यक्त केला.
“गोमावसाच्या नावाखाली वाहन चालकांना लक्ष्य करून त्यांना त्रास देणे, मारहाण करणे हे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाहीत. आता तर गाड्या जाळण्यापर्यंत काही लोकांची मजल गेली आहे. गो मांसाची वाहतूक व तस्करी करणे चुकीचे आहे पण कायदा हातात घेण्याचे आदेश यांना कोणी दिले, सरकारच्याच आशीर्वादाने हा सैराट सुरू असल्याचे चित्र आहे. या सर्व प्रकारामागे कोणाचे आशीर्वाद आहे, याचा खुलासा एसआयटी चौकशीद्वारेच व्हायला हवा,” अशी जोरदार मागणी बाबुराव धुरी यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यवहार आणि आरोग्याच्या सोयी मोठ्या प्रमाणावर गोव्यावर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत गोव्याच्या वाहनांना टार्गेट करणे ही लोकांच्या जिवाशी खेळण्यासारखी बाब आहे. कायदा-सुव्यवस्था कोलमडून पडली असून पोलिस यंत्रणा बघ्याची भूमिका घेत आहे, असा घणाघाती आरोप त्यांनी केला.
धुरी यांनी स्पष्ट इशारा दिला की, “सरकारने तात्काळ ठोस कारवाई करून गुन्हेगारांना थारा देणे थांबवावे. अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन करेल.”

