*कोकण Express*
*दुकाने बंद करण्यासाठी कुडाळ नगरपंचायतीची सक्ती : व्यापारी वर्गात संतप्त भावना*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला लक्षात घेता नगर पंचायतीने कडक पावले उचलली आहेत. जीवनावश्यक वस्तू वगळता इतर दुकाने बंद करण्यासाठी नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांकडून सक्ती करण्यात येत आहे. मात्र, यामुळे व्यापारी वर्ग आणि सामान्य जनतेत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. “पोट कसे भरायचे ?” असा सवाल व्यापारी आणि इतर किरकोळ विक्रेत्यांकडून केला जात आहे. त्यातून वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत.
राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शुक्रवारी रात्रीपासून सोमवार सकाळपर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा केली. मात्र प्रत्यक्षात रोजच लॉकडाऊन करण्यात येत आहे. राज्याप्रमाणे कुडाळ नगर पंचायतीनेही लॉक डाऊनची कडक अंमलबजावणी सुरु केली आहे. पूर्वसूचना न देता नगर पंचायतीचे कर्मचारी रस्त्यावर उतरून जीवनावश्यक वस्तू वगळता इतर दुकाने बंद करण्याची सक्ती करीत आहेत. तशा सूचना लाउड्स्पिकरच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
दुसरीकडे या कारवाईमुळे व्यापारी वर्गात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. कोरोनामुळे गेल्या वर्षीचा एप्रिल – मे महिन्याचा हंगाम वाया गेला आहे. गणपतीच्या हंगामावरही व्यापारी वर्ग आणि किरकोळ विक्रेत्यांना पाणी सोडावे लागले. दिवाळीही यथा तथा गेली. आता यावर्षीचा हंगाम हातातोंडाशी आला असताना कारवाईचा वरवंटा सुरु झाला आहे. दुकाने बंद करून बँकांचे हप्ते, लाईटची भरमसाठ बिले, कामगारांचे पगार, जीएसटी, इतर कर भरायचे कसे आणि खायचे काय, असा सवाल विचारला जात आहे.