*कोंकण एक्स्प्रेस*
*निर्माल्यापासून होणार खताची निर्मिती*
*वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव)*
गणेशोत्सवात डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे ‘श्री बैठक वेंगुर्ला‘ यांच्या माध्यमातून अणसूर ग्रामपंचायत येथे संकलन केलेल्या निर्माल्याचे वर्गीकरण करून त्यापासून खत निर्मिती केली जाणार आहे आणि हे खत डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे केलेल्या वृक्षलागवडीसाठी आणि वृक्ष संवर्धनासाठी वापरले जाणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून प्रतिष्ठानचा हा उपक्रम सुरू आहे.
गणपती विसर्जनच्या वेळी सर्वांकडील निर्माल्य संकलन केले असून ते वेंगुर्ला येथील श्री बैठक सभागृहाशेजारील कंपोस्ट खत निर्मिती येथे नेण्यात आले आहे. तेथे निर्माल्यावर खत बनविण्याची प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. निर्माल्यापासून बनविलेल्या खताचा वापर प्रतिष्ठानतर्फे कॅम्प येथे लागवड करण्यात आलेल्या शेकडो वृक्षसंगोपनासाठी केला जाणार आहे.