*कोंकण एक्सप्रेस*
*प्रत्यक्षात मूर्ती नसलेल्या बाप्पाचे अनोखे विसर्जन*
*मुंबई लोअर परेल येथील रुस्तुम रहिवाशी गणेशोत्सव मंडळाचा पर्यावरणपूरक संदेश देणारा*
*शिरगांव : संतोष साळसकर*
अनंत चतुर्दशी म्हटले की गणरायाचे धूमधडाक्यात विसर्जन डोळ्यांसमोर येते. छोट्या मूर्तीपासून मोठमोठ्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येते, परंतु आश्चर्याची बाब म्हणजे लोअर परेल येथील रुस्तम रहिवासी गणेशोत्सव मंडळाने पर्यावरणाचा संदेश देत मूर्ती नसलेल्या गणेशाचे उत्साहात विसर्जन करण्यात आले.
पर्यावरणपूरकतेचा संदेश देत लोअर परेल येथील रुस्तम रहिवासी गणेशोत्सव मंडळाने प्रत्यक्ष मूर्ती न ठेवता, भिंतीवर चार बाय चारच्या फलकावर गणेशाचे चित्र रेखाटून भक्तीचे आणि श्रद्धेचे दर्शन घडवले. मंडळाच्या वतीने अनंत चतुर्दशीला रात्री महाआरती करून नवसाच्या नारळाचे पाणी आणि स्थापन केलेल्या कलशातले पाणी भिंतीवर शिंपडून ते चित्र पुसले आणि अशा अनोख्या पद्धतीने मूर्ती नसलेल्या गणेशाचे भक्तिभावाने विसर्जन केले गेले. लोअर परेल येथील चाळीत गेल्या ४७ वर्षांपासून कधीही गणपतीची मूर्ती आणली नाही तर चाळीच्या एका इमारतीमध्ये एका मोकळ्या भिंतीवर गणपतीचे
चित्र रेखाटून त्याची पूजा केली गेली. चाळीतील रहिवासी बबन कांदळगावकर यांनी ही प्रथा सुरू केली. विविध सणांच्या निमित्ताने ते चाळीतील सूचना फलकावर चित्र काढायचे. एका वर्षी त्यांनी साध्या खडूने गणपतीचे चित्र काढले आणि ती प्रथा सुरू झाली. यावर्षी शैलेश वारंग यांनी हे गणपतीचे चित्र काढले होते.
रुस्तम चाळीतील युवराज पांचाळ आणि श्लोक कांदळगावकर, अर्णव रेवाळे या १३ वर्षांच्या मुलाच्या संकल्पनेतून विराज पांचाळ यांनी साकारलेले सोशल मीडियावर आधारित हे चलचित्र पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. इतक्या वर्षांनंतर आजही ही प्रथा सुरू असून अनंत चतुर्दशीला महाआरती करून गणपतीसमोर भाविकांनी अर्पण केलेले नारळ वाढवण्यात येतात. त्याचे पाणी त्या चित्रावर टाकण्यात येते आणि ते चित्र पुसण्यात येते.