*कोंकण एक्सप्रेस*
*सोमवारपासून पितृपक्षाला प्रारंभ*
*वेंगुर्ला प्रतिनिधी*
दिवंगत व्यक्तींचीही आठवण म्हणून त्यांचे आपल्यावर व आपल्या मुलाबाळांवर आशीर्वाद असावेत म्हणून प्रत्येक घरांमधून श्राद्ध व्हावे हा संकेत आहे. त्या पार्श्वभूमीवर भाद्रपद कृष्ण प्रतिपदा म्हणजेच सोमवार दि. ८ सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू होत आहे. हा पितृपक्ष सर्वपित्री अमावस्येपर्यंत चालणार आहे.
महालयश्राद्ध, भरणी श्राद्ध, नवमी तिथी मिळवणे, निर्वंशी महालय, आदी धार्मिक विधींसाठी गावातील पूरोहितांना निमंत्रण देण्यात आले आहे. अनेक मुंबईकर चाकरमानी महालयश्राद्ध विधी करूनच परतणार असल्याने त्यांची त्या दृष्टीने तयारी सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.
८ सप्टेंबर रोजी प्रतिपदा श्राद्ध, ९ रोजी द्वितीय श्राद्ध, १० रोजी तृतीया व चतुर्थी श्राद्ध, ११ रोजी भरणी श्राद्ध व पंचमी श्राद्ध, १२ रोजी षष्ठी श्राद्ध, १३ रोजी सप्तमी श्राद्ध, १४ रोजी अष्टमी श्राद्ध, १५ रोजी नवमी श्राद्ध, १६ रोजी दशमी श्राद्ध, १७ रोजी एकादशी श्राद्ध, १८ रोजी द्वादशी श्राद्ध, १९ रोजी त्रयोदशी श्राद्ध, २० रोजी चतुर्दशी श्राद्ध व २१ रोजी सर्वपित्री अमावस्या श्राद्ध होणार आहे. (पौर्णिमेचा महालय- सप्टेंबर ११, १४, १५, १८, २१ पैकी कोणत्याही दिवशी करावा.)
भाद्रपद नवमीला अविधवा नवमी म्हणतात. या दिवशी नवरा जिवंत असताना मृत झालेल्या स्त्रीचे श्राद्ध करण्याचा किवा सुवासिनीला भोजन घालण्याचा प्रघात आहे.
पिता जिवंत असताना मुलाने करावयाचे आईच्या वडिलांचे श्राद्ध म्हणजे मातामह श्राद्ध. श्राद्धकर्ता तीन वर्षाच्या पुढील वयाचा झाल्यावर मुंज झालेली नसली तरीही त्यास हे श्राद्ध करता येते. माताहिंच्या (आजोबांच्या) वर्षश्रद्धा पूर्वी मात्र हे श्रद्धा करता येत नाही. मातामहिंनसाठी (आजोबांसाठी) नातवाने म्हणजे मुलीच्या मुलाने या दिवशी ब्राह्मणाला देण्याकरिता देवापुढे दक्षिणा काढून ठेवायची पद्धत आहे. काही ठिकाणी या दिवशी त्यानिमित्त ब्राम्हणाला बोलावून दूध, केळे व दक्षणा देतात. हे फक्त अश्विन शुद्ध प्रतिपदेला करता येते. यावर्षी २२ सप्टेंबर रोजी घटस्थापनेदिवशी माता मातामह श्राद्ध होणार आहे.