*कोकण Express*
*कवी उत्तम पवार काव्य पुरस्कार शेषराव पिराजी धांडे यांना जाहीर*
*दर्पण प्रबोधनीतर्फे आयोजन*
*कवी अजय कांडर, प्रा.डॉ. सोमनाथ कदम, कवी सिद्धार्थ तांबे यांच्या निवड समितीचा निर्णय*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्गच्या परिवर्तन चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ते तथा प्रसिद्ध कवी उत्तम पवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ यावर्षीपासून दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गतर्फे राज्यस्तरीय काव्य पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. 2020 सालचा हा पुरस्कार वाशिम येथील कवी शेषराव पिराजी धांडे यांच्या ‘बिघडलेले होकायंत्र’ या काव्यसंग्रहाला जाहीर झाला असून पाच हजार रोख, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे स्वरूप असलेल्या या पुरस्काराची निवड प्रसिद्ध कवी अजय कांडर, प्रा.डॉ.सोमनाथ कदम आणि कवी सिद्धार्थ तांबे यांच्या निवड समितीने केली असल्याची माहिती दर्पण प्रबोधिनीचे अध्यक्ष राजेश कदम यांनी दिली.
दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग या सामाजिक संस्थेच्यावतीने संस्थेचे प्रेरणास्थान दिवंगत कवी उत्तम पवार यांच्या वैचारिक तसेच साहित्यिक योगदानाची प्रेरणा पुढील पिढीला सतत मिळत रहावी या उद्देशाने महाराष्ट्रातील साहित्य चळवळीत परिवर्तनाचे भान ठेवून लिहिणाऱ्या कवीला दरवर्षी उत्तम पवार स्मृती काव्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.या पहिल्या वर्षीच्या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून सुमारे पंचवीस काव्यसंग्रह पाठवून कवींनी उत्तम प्रतिसाद दिला. प्राप्त काव्यसंग्रहातून वाशिम येथील शेषराव पिराजी धांडे यांच्या ‘बिघडलेले होकायंत्र’ या काव्यसंग्रहाची सदर काव्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.सध्याची कोविड परिस्थिती लक्षात घेऊन पुरस्कार वितरण कोरोना नंतर करण्यात येणार आहे.
कवी शेषराव धांडे यांनी आपल्या कवितेतून मग्रूर समाजव्यवस्थेचे दाहक चित्रण मांडले आहे. शोषित पीडित घटकांचे दुःख, वेदना, चीड, विद्रोह अधोरेखित करताना मोडकळीस आलेल्या माणसाला प्रकाशाच्या सम्यक पाऊल वाटेवर आणण्याचा ध्यास हा कवी आपल्या कवितांमधून धरताना दिसतो.प्रतिक्रांतीचे आव्हान समोर असताना समतेच्या विचारांची पेरणी करण्याचा ध्यास जपणारी धांडे यांची कविता शोषितांचा आवाज बनू पाहते. मानवी जगण्या संबंधीचे मूलभूत प्रश्न आणि समतेच्या लढाईतील जागा अचूकपणे प्रतिबिंबीत करणारा बिघडलेले होकायंत्र हा काव्यसंग्रह आहे .यामुळेच या काव्यसंग्रहाची उत्तम पवार काव्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याचे श्री कदम यांनी सांगितले. पुरस्कार प्रक्रियेसाठी विशेष सहकार्य स्नेहल सुनिल तांबे यांनी केले असून संस्थेचे सरचिटणीस आनंद तांबे, विशाल हडकर, अनिल तांबे, नेहा कदम आणि दर्पण परिवार यांनी विशेष योगदान दिले आहे.

