*कोंकण एक्सप्रेस*
*सिंधुदुर्गातून पहिली मराठा टीम उद्या रवाना होणार*
*बाबुराव धुरी करणार नेतृत्व : आरक्षणाशिवाय माघार नाही! : केला निर्धार*
*सिंधुदुर्ग*
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला चार दिवस पूर्ण झाले असून मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस उग्र होत चालला आहे. शासनाकडून ठोस निर्णय न घेतल्याने समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. राज्यभरातून या आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून आता सिंधुदुर्गातूनही आरक्षणाच्या लढ्यात सहभागी होण्यासाठी पहिली मराठा टीम उद्या रवाना होणार आहे.
या टीमचे नेतृत्व शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी करणार असून धुरी यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की आरक्षण मिळेपर्यंत समाज मागे हटणार नाही. मराठा समाजाला न्याय मिळाल्याशिवाय हा लढा थांबणार नाही आणि पुढील दिवसांत संघर्ष अधिक तीव्र केला जाणार आहे.
मराठा समाजाची सहनशीलता आता संपत आली आहे. शासनाने वेळकाढूपणा केला तर आंदोलन ज्वालामुखीसारखे उसळेल, असा सूर कार्यकर्त्यांतून उमटत आहे. सिंधुदुर्गातून रवाना होणारी ही पहिली मराठा टीम समाजाच्या हक्कासाठी निर्णायक ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.