*कोंकण एक्सप्रेस*
*एमकेसीएलचा २५ वा स्थापनादिन श्रावणी कंप्यूटर एज्युकेशन तळेरे येथे उत्साहात साजरा*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) या राज्यातील संगणक शिक्षण क्रांती घडवणाऱ्या संस्थेच्या पंचविसाव्या स्थापनादिनाचा सोहळा तळेरे येथील श्रावणी कंप्यूटर एज्युकेशनमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली.
या सोहळ्यास तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाचे अध्यक्ष सन्माननीय उदय दुदवडकर, तळेरे पीएम श्री शाळेतील शिक्षक पालक संघटनेचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय राजेश जाधव, दैनिक प्रहारचे तळेरे वार्ताहर सन्माननीय गुरुप्रसाद सावंत, नाद–पाडगाव केंद्राचे केंद्रप्रमुख सन्माननीय लवू दहिफळे, ओझरम मापारवाडी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सन्माननीय जाकीर शेख, दळवी महाविद्यालयाचे प्राध्यापक सन्माननीय नरेश शेटे, सन्माननीय शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते नितीन पाटील तसेच कासार्डे येथील उद्योजक रोहित आंबेडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सतीश मदभावे यांनी २००१ पासून २०२५ पर्यंतच्या एमकेसीएलच्या प्रवासाचा आढावा घेतला. महाराष्ट्रापुरतेच मर्यादित न राहता ओडिशा, राजस्थान, हरियाणा आदी १६ राज्यांमध्ये एमकेसीएलच्या उपक्रमांचा विस्तार झाल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर सौदी अरेबिया व इजिप्त येथेही महाराष्ट्राच्या ज्ञानदीपाची छाप पडल्याचा त्यांनी उल्लेख केला. राज्यभरातील तब्बल ६३०० एमएस-सीआयटी केंद्रांद्वारे सुमारे अडीज कोटींपेक्षा अधिक विद्यार्थी संगणक साक्षर झाले असल्याची माहितीही त्यांनी याप्रसंगी दिली.
गेल्या १२ वर्षांपासून श्रावणी कंप्यूटर एज्युकेशनने ग्रामीण शंभागात संगणक शिक्षणाची ज्योत प्रज्वलित ठेवली आहे. या काळात १०० हून अधिक शिक्षकांना एमएस-सीआयटी साक्षर केले असून महिलांना संगणक शिक्षणाद्वारे आत्मनिर्भर बनविण्याचा उपक्रमही यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाशी विद्यार्थ्यांचा परिचय व्हावा यासाठी चॅटजीपीटीसारख्या अत्याधुनिक साधनांची ओळख करून दिली गेली आहे.
या विशेष सोहळ्यात एमकेसीएलच्या वतीने सर्वसामान्यांसाठी विविध मोबाईल ॲप्लिकेशन्स, वेबसाईट आणि पुस्तकांचे लोकार्पणही करण्यात आले. यामध्ये सायबर रक्षक हा मोबाईल ॲप मंत्र्यांच्या हस्ते सर्वांसाठी खुला करण्यात आला. ॲप मास्टर नावाचे नवे मोबाईल ॲप लॉन्च करण्यात आले. सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते sahityasrushti.org या वेबसाईटचे उद्घाटन झाले. याचबरोबर ‘आयटीत मराठी – ऐटीत मराठी” या मोबाईल ॲपचे अनावरण आणि विविध पुस्तकांचे लोकार्पणही या प्रसंगी पार पडले. त्यामुळे या स्थापनादिन सोहळ्याला तंत्रज्ञान, सर्जनशीलता आणि साहित्य यांचा त्रिवेणी संगम लाभला. हा संपूर्ण कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने सर्वांनी अनुभवला
मान्यवरांनी संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या. महिला विद्यार्थिनींनी संगणक शिक्षणामुळे दैनंदिन जीवनात सुलभता आली असल्याचा अनुभव अभिव्यक्त केला. पत्रकार अंकित घाडीगावकर यांनी या केंद्रामुळे विद्यार्थ्यांना शहरात जावे लागत नाही, हे समाधानकारक असल्याचे सांगितले. तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय दुदवडकर यांनी श्रावणी कंप्यूटर एज्युकेशनच्या सामाजिक बांधिलकी जपून विद्यार्थ्यांना सृजनशील घडविण्याच्या प्रात्यक्षिक कृती कार्याचा गौरव केला.
सौ. श्रावणी मदभावे आणि सतीश मदभावे यांनी उपस्थित सर्व मान्यवर, पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. कार्यक्रमाच्या समारोपाला एमकेसीएलच्या ब्रीदवाक्याप्रमाणे “ज्ञानदीप लावू जगी” या उक्तीचे प्रतीक म्हणून सर्व मान्यवरांना पणती सारख्या ज्ञानदीप स्वरूपातील भेटवस्तू देऊन विशेष सन्मानित करण्यात आले. हा क्षण कार्यक्रमाची खरी शोभा ठरला.रांगोळ्यांनी सजलेल्याजू वातावरणात रोशनी बागवे, शिवानी जाधव, नेहा रहाटे आणि शिवानी राणे यांच्या योगदानामुळे कार्यक्रम अधिक संस्मरणीय झाला.