*कोंकण एक्सप्रेस*
*स्वरधिराज राजाभाऊ शेंबेकर यांची संगीत मैफिल ठरली यादगार*
*वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव)*
वेंगुर्ला येथे संपन्न झालेल्या ‘तार वाजे काळजाची‘ या अभंग, नाट्य आणि भक्तिगीतांच्या मैफिलीत कोकण गंधर्व, स्वरधिराज राजाभाऊ शेंबेकर यांनी विविध रागातील आपल्या उत्कृष्ट गायनाने रसिकांना खिळवून ठेवले.
सौ.अनघा गोगटे संचलित सरस्वती संगीत विद्यालयातर्फे गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने १७ ऑगस्ट रोजी वेंगुर्ला-कॅम्प येथील नाटककार मधुसूदन कालेकर सभागृहात गुरूवंदना कार्यक्रमाचे आयोजन होते. या कार्यक्रमात कोकण गंधर्व, स्वराधिराज राजाभाऊ शेंबेकर यांचा अभंग, नाट्य व भक्तिगीतांच्या संगीत मैफिलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या संगीत मैफिलीचे उद्घाटन राजाभाऊ शेंबेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.बी.गोस्वामी, अॅड.सूर्यकांत प्रभूखानोलकर, कीर्तनकार अवधूत नाईक, सरस्वती संगीत विद्यालयाच्या संचालिका अनघा गोगटे, अरूण गोगटे आदी उपस्थित होते.
मैफिलीची सुरूवात ‘जेथोनी उद्गार प्रसवे ओंकार‘ या गणेश स्तवनाने झाली. त्यानंतर ‘आज गान शारदेस‘, ‘दिवे लागले तमाच्या तळाशी‘, प्रेम वरदान‘, ‘कोण असशी तू‘, ‘सुखाचे जे सुख‘, ‘अनंता तुला कोण पाहू शके‘ अशी एकापेक्षा एक अभंग, नाट्यगीत आणि भक्तिगीते सादर केली. त्यातील काही रचना विविध रागात सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. मैफिलीची सांगता ‘अच्युता अनंता श्रीधरा माधवा‘ या भैरवीने झाली.
या मैफीलीला ऑर्गनवर प्रसाद शेवडे, हार्मोनियमसाठी अमित मेस्त्री, तबल्यासाठी प्रसाद मेस्त्री आणि पखवाजासाठी आनंद मोर्ये यांनी केलेल्या उत्कृष्ट संगीतसाथीच्या जोरावर आणि संजय कात्रे यांनी सुरेख निवेदनातून ही मैफील यादगार बनली. सरस्वती संगीत विद्यालयाच्यावतीने अरूण गोगटे यांनी सर्वांचे आभार मानले.
फोटोओळी – ‘तार वाजे काळजाची‘ या संगीत मैफिलीत कोकण गंधर्व, स्वरधिराज राजाभाऊ शेंबेकर यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले.