परिसरातील रानभाज्या ओळखून आहारात आणण्याची गरज: राजेंद्र केरकर

परिसरातील रानभाज्या ओळखून आहारात आणण्याची गरज: राजेंद्र केरकर

*कोंकण एक्सप्रेस*

*परिसरातील रानभाज्या ओळखून आहारात आणण्याची गरज: राजेंद्र केरकर*

*दोडामार्ग/ *शुभम गवस*

फास्टफूडच्या जमान्यात पिझ्झा-बर्गर आणि चायनिजकडे वळालेल्या तरुण पिढीला कोकणच्या समृद्ध खाद्यसंस्कृतीची जाणिव आणि येथे उपलब्ध असलेल्या पोषणमूल्यांनी परिपुर्ण आरोग्यदायी रानभाज्यांची ओळख करून देण्याच्या उद्देशाने ल. सी. हळबे महाविद्यालयात रानभाजी महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि हॉस्पिटॅलिटी स्टडीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन गोव्यातील ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ तथा खाद्यसंस्कृतीचे अभ्यासक श्री. राजेंद्र केरकर यांचे हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत हे होते.
या महोत्सवात कुरडू, टाकळा, चिवार, अळु, आघाडा, शेवगा भाजी, सुरण, पानफुटी, शेगुळ अशा विविध रानभाज्यांपासून बनविलेले पदार्थ विद्यार्थ्यांनी सादर केले. त्याचबरोबर भाज्यांचे शास्त्रीय आणि स्थानिक नावे, त्यांमध्ये असलेले पोषणमूल्ये, त्यांचा कालावधी व फायदे, पारंपरिक आणि आधुनिक पद्धतीने भाज्यांच्या पाककृती, व इतर माहिती चार्ट्सच्या माध्यमातून प्रदर्शित केली.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री. केरकर म्हणाले की आपल्या भागात मिळणाऱ्या रानभाज्यांमुळे माणसाचे आरोग्य उत्तम राहते. याउलट बाजारातून किंवा इतर प्रदेशातून आलेल्या भाज्यांमुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढून आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यांनी विद्यार्थ्यांना घोटवेल, पेंढारे, रानकरमळ, कदंब, सुलेची भाजी, ब्राह्मी, भारंगी, गुळवेल, चिड्डो, फागला, दिनो यांसारख्या अनेक रानभाज्यांचे गुणधर्म आणि आहारातील महत्त्व स्पष्ट केले. आपल्या स्थानिक आहार परंपरेमुळे पर्यावरण, आरोग्य आणि संस्कृतीशी जवळीक साधता येते, तसेच यापासून बनविलेल्या पदार्थांचे मार्केटिंग केले तर चांगला रोजगार मिळू शकतो असे प्रतिपादन केरकर यांनी केले. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी विस्तार विभाग आणि हॉस्पिटॅलिटी स्टडीज या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक डॉ. सोपान जाधव तर आभारप्रदर्शन डॉ. एस. एन. खडपकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!